मुंबई : विश्वविक्रम हे कायमच अनेकांना आश्चर्यचकित करणारे ठरतात. कोण, कधी आणि कसा विक्रम रचेल याचा खरंतर काहीच नेम नसतो. हो पण अनेकदा यामागे फार मोठा संघर्ष आणि जिद्दही असते. सध्या अशाच एका जिद्दी आणि तितक्याच समर्पक तरुणाची चर्चा जागतिक स्तरावर होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातीलच नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालूक्याच्या सांगवीमधील बालाजी सुर्यवंशी असं या तरुणाचं नाव. यानं आपल्या राहत्या घरातच जवलपास वीस तास चालून एक अनोखा जागतिक विक्रम साकारला आहे. या कामगिरीमुळं सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. 


देगलूर तालुक्यातील सांगवी (क) येथे शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या बालाजीनं आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यशाचं शिखर गाठलं. 


वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी बालाजी सुर्यवंशीनं मुंबईतील राहत्या घरात सतत १९ तास ५५ मिनिटे चालत जवळपास ६८ किलोमीटराचा प्रवास घरातल्या घरातच केला आहे आणि त्यामध्ये त्यानं एक लाख एकशे अठ्ठावीस (१,००,१२८) पावलं चालण्याचाही विक्रम रचला आहे. 


२० सप्टेंबरला त्यानं रात्री बारा वाजता चालण्यास सुरुवात केली आणि त्याच रोजी संध्याकाळी ठीक सात वाजून ५५ मिनिटांनंतर आपलं चालणं थांबवलं. देशातील अश्या प्रकारच्या आगळ्या वेगळ्या सर्वोच्च कामगिरी करणार्‍या असामान्य व्यक्तींची नोंद ठेवणारी सरकारमान्य ''इंडीया बुक ऑफ रेकॉर्ड'' या प्रतिष्ठीत संस्थेनं त्याच्या या आगळ्यावेगळ्या विक्रमाची दखल घेतली . 


 


आपल्या कृतीतून एखादा समाजिक संदेश जाणं गरजेचं आहे असाच मानस त्यानं मनी बाळगला होता. याचबाबत सांगतना तो म्हणाला, 'सध्या या कोरोनामूळे लोक बरीच महिने झाले घरात आहेत, त्यामुळं आरोग्याविषयी निष्काळजी वाढत चालली आहे. मी हा रेकॉर्ड बनवण्याचं ठरवल कारण मला लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करायची होती. मला फक्त एवढाच संदेश द्यायचा आहे की जर आपल्याला खरोखर सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगायचं असेल तर आपल्याला ना जीमची, ना खुल्या जागेची किंवा ना विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. आपण फक्त उपलब्ध किंवा मर्यादित स्रोतांचा वापर करून आपलं आरोग्य तंदुरुस्त ठेवून, निरोगी जीवन जगू शकतो'. अतिशय सुरेख आणि तितकाच पटणारा संदेश त्याच्या या विक्रमाच्या निमित्तानं सर्वांनाच मिळाला. ज्याच्या अवलंबानं खऱ्या अर्थानं सर्वांना फायदा होणार आहे.