मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात
Manipur Violence : मणिपूरमध्ये अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. मणिपूर राज्यात जातीय हिंसाचार वाढला आहे. मणिपूर येथील IIIT विद्यापीठात शिकण्यासाठी गेलेले 12 विद्यार्थी अडकलेत.
Maharashtra students stuck in Manipur : मणिपूरमध्ये अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) मैदानात उतरले आहेत. मणिपूर राज्यात जातीय हिंसाचार वाढला आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये सध्या दहशतीचे वातावरण आहे. मणिपूरमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी अडकले असल्याने पालक शरद पवार यांना भेटायला आले होते. मणिपूर येथील IIIT विद्यापीठात शिकण्यासाठी गेलेले 12 विद्यार्थी अडकलेत. पवार या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहेत. सरकार याबाबत दिरंगाई करत असल्याचा पालकांचा आरोप आहे. पवार यांनी मणिपूर सरकारशीही चर्चा केली आहे.
राज्य सरकार पुढे सरसावले
मणिपूरमधल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकार पुढे सरसावले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना फोन करुन काळजी करु नका असं सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचारामुळे परिस्थिती तणावाची आहे.. स्थानिक तणावामुळे विद्यार्थी चिंतित आहेत. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी विद्यार्थ्यांना फोन करुन त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. फडणवीसांनी मणिपूर सरकारशीही संपर्क साधला आणि महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात ठेवण्याची विनंतीही केली.
मणिपूर राज्यात हिंसाचाराचा आगडोंब
मणिपूर राज्यात हिंसाचाराचा आगडोंब उसळलाय. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मोठा जातीय हिंसाचारात सुरु झाला. हा हिंसाचारात मृतांचा आकडा 54 वर गेला आहे. या ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच दुसरीकडे आज होणारी वैद्यकीय प्रवेश परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. या हिंसाचारात उत्तर प्रदेशचे सुमारे 60 विद्यार्थीही अडकल्याची माहिती आहे. हे सर्व विद्यार्थी राजधानी इंफाळमधील एनआयटीचे विद्यार्थी आहेत. राज्यात कायदा व्यवस्था बिघडल्याने कर्फ्यू लावण्यात आला आहे. दरम्यान, यात थोडीशी शिथिलता आणली गेली आहे. त्यामुळे लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी मणिपूर सरकाराने रविवारी सकाळी 7:00 ते सकाळी 10:00 पर्यंत कर्फ्यू अंशतः शिथिल केला आहे.
बेपत्ता मुलींबाबत धक्कादायक बातमी
दरम्यान, राज्यातल्या बेपत्ता मुलींबाबत सर्वात मोठी धक्कादायक बातमी. राज्यातल्या बेपत्ता मुलींची आकडेवारी ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसेल. राज्यातून 18 ते 25 वयाच्या रोज सरासरी 70 मुली बेपत्ता होत आहेत. मार्च महिन्यात 2 हजार 200 मुली बेपत्ता झाल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यापेक्षा ही आकडेवारी 307 ने अधिक आहे. मुली, तरुणी आणि महिलांचं घर सोडून जाण्याचं प्रमाण अलिकडच्या काळात प्रचंड वाढले आहे. प्रेमप्रकरणातून आमिषाला बळी पडून जाणा-या मुलींची संख्या सर्वाधिक आहे. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातून मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक दिसून आले आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, ठाणे, अहमदनगरमध्ये बेपत्ता मुलींचं सर्वाधिक प्रमाण आहे.