मनमाडची पाणीबाणी पंतप्रधानांच्या दरबारी, ईमेलद्वारे केल्या तक्रारी
पाच वर्षांपूर्वी शहराला तब्बल ५६ दिवसांनी पाणी पुरवठा झाला होता.
निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड : नाशिक जिल्ह्यात मनमाडला भीषण पाणीबाणी निर्माण झाली आहे. सध्या शहराला टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईने हवालदिल झालेल्या सामान्य नागरिकांनी थेट पंतप्रधान दरबारी मनमाडच्या पाणीटंचाईची कैफियत मांडायला सुरवात केली आहे. ऑनलाईन, मेल व अॅपद्वारे हा प्रश्न पंतप्रधानांपर्यंत पोहचवला आहे.
वर्षानुवर्षे मनमाडला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पाच वर्षांपूर्वी शहराला तब्बल ५६ दिवसांनी पाणी पुरवठा झाला होता. आता शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणात ठणठणाट आहे. त्यामुळे पालिकेने नळाने पाणीपुरवठा बंद केला आहे. पुन्हा एकदा शहराला टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ पालिकेवर आली आहे. टँकरने पाणी पुरवठा करणारे मनमाड हे राज्यातील एकमेव शहर ठरले आहे.
मनमाडचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी अनेक मोठ्या योजना सुचविण्यात आल्या. मात्र राजकीय इच्छाशक्ती अभावी त्या योजनाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. मनमाडकर आजही तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी थेट पंतप्रधानांच्या दरबारी मनमाडचा पाणीप्रश्न मांडायला सुरवात केली आहे. मनमाडच्या काही तरुणांनी पाणीप्रश्न पंतप्रधानांपर्यंत पोहचविण्यासाठी ऑनलाईन मोहीम उघडली असून त्यात नागरिकही सहभागी होत आहे. हजारोंच्या संख्येने त्यात आपला सहभाग नोंदवित आहे. विशेष म्हणजे परदेशात असलेले मनमाडकरही या मोहिमेत सहभागी होत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ही ऑनलाईन लिंक शेअर केली जात आहे.
ऑनलाईन तक्रारीप्रमाणे सामान्य नागरिक आता ईमेल करून पंतप्रधानांपर्यंत हा प्रश्न पोचविण्याचा प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान कार्यालयाला ईमेल पाठवून मनमाडला तीनशे किलोमीटरवरुन पेट्रोल-डिझेल येऊ शकते. तर अवघ्या ८० किलोमीटर मनमाडला जलवाहिनीने पाणी का दिले जात नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. मनमाडचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढणारी करंजवण थेट जलवाहिनी टाकून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची अपेक्षा पंतप्रधानांकडे केली आहे. तर काही लोकांनी नमो अॅपवर हा प्रश्न पंतप्रधानांपर्यंत पोहचविला आहे.
गेल्या चार दशकांपासून मनमाडचा पाणीप्रश्न सुटू शकला नाही. त्यामुळे मनमाडकर हवालदिल झाले असून आता पंतप्रधानच हा प्रश्न मार्गी लावतील या भाबड्या आशेने सामान्य नागरिकांनी आता थेट पंतप्रधानांना साकडे घालायला सुरवात केली आहे. पंतप्रधानांनी तरी मनमाडच्या भीषण पाणीप्रश्नात लक्ष घालून मनमाडकरांच्या घश्याला लागलेली तहान कायमस्वरूपी मिटविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.