Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी सरकारला डेडलाईन दिल्यानंतर मनोज जरांगेंनी (Manoj Jarange Patil) उपोषण स्थगित केलं खरं मात्र स्वस्थ बसतील ते जरांगे कुठचे... आपला लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार जरांगेंनी केलाय. लवकरच ते राज्यव्यापी दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते मराठा बांधवांची भेट घेऊन आपली भूमिका समजावून सांगतील. याशिवाय 1 डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण (Chain hunger strike) करण्याचा निर्धारही जरांगेंनी केलाय. सोमवारी सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेणार आहे. त्यानंतर जरांगे आपली भूमिका जाहीर करणार आहेत. शिष्टमंडळाच्या भेटीवेळी सरकारला दिलेल्या टाईमबॉन्डचा मुद्दाही मार्गी लागणारंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यात पहिल्यांदाच एकाच वेळी तीन तीन समित्या काम करतायेत. एका अंदाजानुसार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत तपासणीनंतर प्रशासनाला कुणबी समाजाच्या 13 हजार नोंदी आढळल्या होत्या. त्याविषयीचा अहवाल राज्य शासनानं स्वीकारला असून येत्या काही दिवसांत मराठवाड्यातील अडीच लाख मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचा लाभ मिळू शकतो. 


मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात 20 लाख कुटुंबं म्हणजे 1 कोटी कुणबी समाज असल्याची प्राथमिक माहिती आहे. मनोज जरांगेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकार कामाला लागलंय. जरांगेंनी दिलेल्या डेडलाईनचा तिढा सोमवारी सुटण्याची शक्यता आहे. मात्र या डेडलाईनच्या काळात जरांगे राज्यव्यापी दौरा करणार असल्यानं सरकारच्या डोक्यावर भविष्यातल्या आंदोलनाची टांगती तलवार असेल, एवढं नक्की..


जरांगेंचा 'प्लॅन बी' तयार


सरकारवर विश्वास असला तरी आम्ही आमची बाजू भक्कम करतोय. आम्हाला दगा फटका होण्याचीही भीती आहे. त्यामुळे आंदोलनाची तयारी ही आमची सुरू आहे आणि येत्या एक तारखेपासून गावागावात साखळी उपोषण सुरू होईल. ज्या गावात आधीपासून आहे तिथे राहीलच आणि नव्याने गावांचा समावेश होईल असेही जरांगे पाटील म्हणाले.