जरांगे मागे फिरले पण तणाव कायम! जालना, बीडची बॉर्डर बंद; 3 जिल्ह्यात इंटरनेट सेवा स्थगित; एसटीलाही ब्रेक
Maratha Reservation Jalna Beed Chhatrapati Sambhaji Nagar Updates: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे येण्याचा आपला निर्णय रद्द करत पुन्हा माघारी फिरण्याची घोषणा केल्यानंतरही जालना आणि बीडमध्ये मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Maratha Reservation Jalna Beed Chhatrapati Sambhaji Nagar Updates: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत थेट त्यांना भेटण्यासाठी मुंबईतील 'सागर' बंगल्यावर जाण्यासाठी निघालेले मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे माघारी फिरले आहेत. जरांगे पाटलांनी मुंबईला जाण्याचा निर्णय रद्द केला आहे. भांबेरी गावात रात्रभर हजारो समर्थकांसहीत मुक्काम केलेले जरांगे-पाटील यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शहाणी भूमिका घेऊन परत जात आहे, असं म्हटलं. या निर्णयानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून जालना, बीड आणि संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मागील वेळेस मराठा आंदोलनाच्या काळात बीड आणि जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर ही अधिक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
पोलीस छावणीचं स्वरुप; सीमा सील
अंतरवाली सराटीमध्येही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगल नियंत्रण पथक जालन्यामध्ये दाखल झालं असून अंतरवाली सराटीमध्ये अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जालना आणि बीड जिल्ह्याच्या सीमांवर मोठ्याप्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले असून प्रत्येक गाडी तपासूनच सोडली जात आहे. कोणालाही परवानगी शिवाय या जिल्ह्यांमध्ये प्रवेश दिला जात नाहीये. मागील आंदोलनाच्या वेळेस जालन्यामध्ये आमदाराच्या घर पेटवून देण्यात आलं होतं. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावरही हल्ला करण्यात आला होता.
इंटरनेटही बंद
रविवारी दुपारी मनोज जरांगे-पाटील अचानक मुंबईला जायचंय म्हणत अंतरवाली सराटीमधून निघाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांचा एकच गोंधळ उडाला. अंतरवाली सराटीपासून काही किलोमीटरवरील भांबेरी गावातून मागे फिरले. मात्र या कालावधीत तातडीने मोठ्याप्रमाणात पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्क करुन जालना आणि बीड जिल्ह्यात संवेदनशील भागांमध्ये तैनात करण्यात आलं. पोलिसांनी बीड आणि जालन्याच्या सीमांवर चेकपोस्ट उभारले असून सीमा सील केल्या आहेत. बीडमध्ये तब्बल 38 ठिकाणी नाकाबंदी लागू करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात 37 (1)(3) महाराष्ट्र पोलीस कायदा लागू करण्यात आला आहे. बीडमध्ये आज म्हणजेच सोमवारी (26 फेब्रवारी रोजी) दुपारी 4 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीड प्रमाणेच जालना आणि छत्रपती संभाजी नगरमध्येही इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अनेक मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांना प्रशासनाच्या निर्देशानुसार इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचे संदेश पाठवण्यात आले आहेत.
नक्की वाचा >> Maratha Reservation: जरांगेंचे समर्थकांनी ST जाळली! प्रशासनाने घेतला मोठा निर्णय; पुढील सूचना मिळेपर्यंत..
एसटी सेवाही बंद
भांबेरी गावामधून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी तयारी करत असलेल्या मनोज जरांगे-पाटलांच्या शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे या 2 सहकाऱ्यांना पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतलं. या घटनेचे पडसाद जिल्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे राज्य परिवहन महामंडळाची बस पेटवून दिली. या जाळपोळीनंतर पुढील सूचना मिळेपर्यंत एसटीची सेवा जालना जिल्ह्यामध्ये स्थगित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.