Manoj Jarange: मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसले असताना दुसरीकडे मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने आज मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला. सकल मराठा बांधवांच्या वतीने नाशिकमध्ये मुंबई-आग्रा रोड वर रस्ता अडवण्यात आला. या आंदोलनात शेकडो मराठा सहभागी झाले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हा रास्ता रोको केल्याचं त्यांनी सांगितलं. यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी 10 वी, 12 वीची परीक्षा असल्याने शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच 20, 21 तारखेनंतर मुंबईला कधी जायचं आहे ते सांगू असंही म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मराठा समाजाला विनंती आहे की सध्या 10वी, 12 वीची परीक्षा आहे. त्यामुळे शांततेत आंदोलन करा. विद्यार्थ्यांची गैरसोय करू नका. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाता यायला हवं. विद्यार्थी हे देश आणि राज्याचे भवितव्य आहेत. त्यांना अडचण यायला नको याची काळजी घ्या. 
20 आणि 21 तारखेनंतर मुंबईला कधी जायचं ते सांगू," असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. 


"छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धूमधडाक्यात साजरी करा.  मराठा आंदोलन शांतपणे पण ताकदीने करा. आता आमचं शेतीचं काम उरकलेलं आहे. आंदोलन करताना काळजी घ्या. आपल्यात कुणी शिरतं का? विद्यार्थ्यांना परीक्षेत अडचण येणार नाही याची खबरदरी घ्या. 
लोकशाही मार्गाने आंदोलन करावेत. 20-21 तारखेपर्यंत सरकार सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करतं का ते बघू आणि नंतर ठासून आंदोलन करू," असं सांगतना मनोज जरांगे यांनी मराठा समाजकडून विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होता कामा नये असं सांगितलं. 



"सरकारकडून कोणतंही पत्र आलेलं नाही. समाजासाठी उपचार घेणं सुरू आहे. सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय थांबणार नाही," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. पुढे ते म्हणाले, "सगे सोयऱ्यांचा अध्यादेश तर काढला त्याची अंमलबजावणी करा. 
बाँम्बे हैद्राबाद गॅझेट घ्या. शिंदे समितीला 1वर्षाची मुदतवाढ घ्या. आंतरवालीसह राज्यातील सर्व गुन्हे मागे घ्या".


मागासवर्ग आयोगावर ते म्हणाले की, "त्यांनी टक्केवारी कशी काढली मला माहीत नाही. त्यांच्या मनानेच 10 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली का मला माहीत नाही. हा आयोग याच आंदोलनामुळे तयार झाला आहे. मराठयांना ओबीसीतून आरक्षण हवं आहे त्यासाठीच हे आंदोलन उभं राहिलं आहे. ज्याला जे आरक्षण घ्यायचं ते घेतील. मराठयांना 75 वर्षात न्याय मिळालाच कधी? आता मराठे दहशतीला घाबरत नाही. आता आमच्या लढण्याने न्याय मिळाला आहे. सरकार देत असलेलं आरक्षण घेणारे तरी किती जण आहेत?". मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेले 10 टक्के आरक्षण वाढून देण्याची मागणी करण्यास जरांगे यांनी नकार दिला. 



"आंदोलन आणि शिवजयंती यांचा काही संबंध नाही. पास असणार तोच गडावर जाता कामा नये. सगळ्यांना दर्शन घेता यायला हवं. सरकारने हे बंधन काढून टाकायला हवे. आमच्यावर कोण अन्याय करतो तेच बघावं लागेल, उपोषणासकट मी जयंतीला जाता येईल का हे सरकारला विचारतो, रुग्णवाहिकेत बसून कुठे जाता येईल का ते बघतो. प्रशासनाने परवानगी दिली तर शिवनेरी किंवा आणखी कुठे जाता येईल का ते बघतो," असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. 


"जो आमच्या विरोधात कटकारस्थान करतो, मराठे त्यांच्याच मागे लागतील. मराठे तुम्हाला सोडणार नाही. आपण संयमाने जिंकलो आहे. आपण विचारपूर्वक आंदोलन करू. आता सर्व कामे उरकलेली आहे. पश्चाताप म्हणजे काय याची व्याख्या करायला सरकारला लोक ठेवावी लागतील इतके मोठे आंदोलन होईल. सरकार आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेणार नाही. मराठ्यांचे प्रश्न आले की तुम्ही आचारसंहिता लावणार का? मग तुमचे टांगे पलटी होतील. आता समाज हुशार झाला आहे. मराठ्यांच्या जीवावर तुम्ही दादा झालेत. तुम्ही मराठ्यांच्या नादाला लागू नका," असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.