मराठा आरक्षणाचा राग लालपरीवर! मराठवाड्यात 85 बसेसची मोडतोड-जाळपोळ; 4 कोटींचे नुकसान
Maratha Reservation: गेल्या 3 ते 4 दिवसापासून मराठवाड्यातील परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड या जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक बंद आहे.
Maratha Reservation: मराठा आरक्षण द्यावे या मागणीसाठी राज्य सरकारला 40 दिवस देण्यात आले. पण यानंतरही मागणी पूर्ण न झाल्याने मराठा समाज आक्रमक झाल आहे. आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आमरण उपोषणावर ठाम असून शांततेत विषय हाताळण्याचे आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे संतप्त आंदोलकांनी आपला राग लालपरीवर काढला आहे. एसटी महामंडळाकडून गेल्या 4 दिवसात झालेल्या नुकसानीची माहिती देण्यात आली आहे.
गेल्या 3 ते 4 दिवसापासून मराठवाड्यातील परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड या जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक बंद आहे. तसेच बीड, छ. संभाजीनगर, सोलापूर जिल्ह्यातील एसटी वाहतूक अंशतः बंद आहे. या जिल्ह्यातील 36 आगाराची वाहतूक पुर्णतः बंद असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आक्रमक जमावाने गेल्या 4 दिवसात 85 पेक्षा जास्त एसटी बसेसची मोडतोड केली तर 4 एसटी बसेस ची जाळपोळ केली आहे. यात बीड जिल्ह्यात यापैकी ७० बसेसची मोडतोड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
एसटी बसेस ची मोडतोड, जाळपोळ झाल्याने अंदाजे 4 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे. असे असल्याने विभागातील वाहतूक पुर्णतः, अथवा अंशतः बंद आहे. यामुळे दररोज एसटीचा 2 ते 2.5 कोटी रुपयांचा महसूल बुडत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मनोज जरांगेंचे आवाहन
वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करु नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. गावागावात आमरण उपोषण करा, साखळी उपोषण करा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. तसेच नेत्यांना गावात बंदी घाला. तुम्हीही त्यांच्या दारात जाऊ नका, असेही ते म्हणाले.
आंदोलकांच्या मागणीनंतर मी घोटभर पाणी प्यायलो आहे. त्यामुळे आंदोलकांनी तोडफोड करु नये. कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.