लग्नाचे मुहूर्त बदलण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन; सर्व धर्मियांना केली विनंती
Maratha Reservation : ओबीसमधून आरक्षण मिळवण्याच्या मागणीवर ठाम असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली आहे. यासोबत 24 तारखेपासून रास्ता रोको करण्याचे आवाहन मनोज जरांगेंनी केलं आहे.
Maratha Reservation : महाराष्ट्र सरकारने विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनातून मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. सरकारने लवकरात लवकर सगेसोयरे अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करावे अन्यथा मोठं आंदोलन करु, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. यासोबत येत्या 24 फेब्रुवारीपासून दररोज राज्यातील प्रत्येक गावात रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी लग्नाचे मुहूर्त बदलण्याची विनंती केली आहे.
"24 तारीख आंदोलन आपापल्या गावात आंदोलन आहे. निवेदन देण्यासाठी हे आंदोलन राहणार आहे. लोक आंदोलनाच्या कामाला लागले आहेत. विद्यार्थ्यांना पेपरसाठी सहकार्य केले जाईल.10:30 ते 1 वाजेच्या दरम्यान सगळ्या राज्यात आंदोलन होईल. विद्यार्थ्यांसाठी वेळ बदलली आहे. सगळ्या गावातल्या लोकांनी रास्ता रोको करुन दरदिवशी निवेदन द्यायचे आहे. 24 तारखेला संत रोहिदास यांची देखील जयंती आहे. त्यांनाही सगळ्यांनी सहकार्या करा. 3 तारखेला प्रचंड लग्न आहे. ज्यांचे लग्न आहे त्यांना विनंती आहे. दुपारी आणि संध्याकाळी मुहूर्त आहेत. आ
दुपारचे लग्न संध्याकाळी ढकलायचा प्रयत्न केला तर गैरसोय होणार नाही. त्यामुळे सगळ्या धर्माच्या लोकांनी यासाठी पुढाकार घ्यावा," असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
"3 मार्चच्या रास्ता रोकोची तयारी राज्यातील सगळया मराठा समाजाने करावी. कधीही झाला नसेल असा हा रस्ता रोको असेल. शांतपणे हे आंदोलन करा आणि राज्यभर एकजूट दाखवा.12:30 वाजता एकाच वेळी हे आंदोलन सुरू झालं पाहिजे," असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
कसे असणार मनोज जरांगेंचे आंदोलन?
24 फेब्रुवारीपासून प्रत्येक गावात, शहरात सकाळी साडेदहा वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे. या काळात प्रत्येकाने आपल्या गावात रास्ता रोको करायचा आहे. ज्यांना सकाळच्या वेळी आंदोलन करता येणार नाही, त्यांनी संध्याकाळी चार ते रात्री 7 वाजेपर्यंत आंदोलन करायचं आहे. या काळात शांततेत आंदोलन करायचे आहे. जाळपोळ किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेऊन आंदोलन करायचे आहे, असे आवाहन मनोज जरांगेंनी केलं आहे. तसेच 29 फेब्रुवारीपर्यंत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी केली नाही, तर 1 मार्चपासून राज्यातील वृद्ध महिला व पुरुषांनी आमरण उपोषणाला बसायचे आहे. आंदोलन करताना एकाचाही जीव गेला, तर त्यास सरकार जबाबदार असेल, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.
3 मार्च रोजी सर्वात मोठा रास्तारोको
दरम्यान, 24 तारखेच्या आंदोलनानंतर 3 मार्चला जगातील सर्वांत मोठा रास्ता रोको करण्याचे आवाहन मनोज जरांगेंकडून करण्यात आले आहे. 3 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच जिल्ह्यांत, एकाच ठिकाणी एकाच वेळी दुपारी 12 ते 1 मोठा रास्ता रोको करायचा आहे. आतापर्यंत अनेक मोठ्या सभा, रॅली आणि आंदोलने झाली. पण एवढा मोठा रास्ता रोको झाला नसेल, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.