`तुमच्या डोक्यातला विषारी विचार मराठा नेत्यांना...`; मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा
Maratha Reservation : मराठा आरक्षणवारुन सुरु असलेल्या वादावरुन मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या अंगावर किती मराठे नेते घालणार आहेत बघुयात, असे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून पेटलेले आहे. दुसरीकडे आरक्षणावरुन ओबीसी नेते विरुद्ध मराठा नेते असाही वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आंतरवली सराटी येथे उपोषणादरम्यान झालेल्या लाठीचार्जवरुन गृहमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. त्यावर आता भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी फडणवीसांनी वातावरण शांत करण्यासाठी दिलगिरी व्यक्त केली असे म्हटल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.
"छगन भुजबळांना आम्ही किंमत देत नाही. त्यांनी लवकर गोळ्या सुरु केल्या तर बरं होईल. फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त करुन चूक केली असे प्रविण दरेकरांना म्हणायचे आहे का? देवेंद्र फडणवीसांनी प्रविण दरेकांना बोलायला सांगितले आहे की माझी चूक होती म्हणून. मग ते चांगले मराठे नेते आहेत. देवेंद्र फडणवीसांनी सांगितले असेल बोल म्हणून. हे त्यांनीच सुरु करायला सांगितले आहे कारण हे सगळे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आहेत. ताटात जेवणारे असे बोलतात. तुमचा मराठा समाजासोबतच सामना आहे. देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या अंगावर किती मराठे नेते घालणार आहेत बघुयात. देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे आम्हाला शांत राहू द्या. तुमच्या डोक्यातला विषारी विचार मराठा नेत्यांच्या डोक्यात ओतू नका. त्यांच्या माध्यमातून मराठ्यांमध्ये कलह घडवू नका," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
"छगन भुजबळांना जातीय वादाचे स्वप्न पडते. पण मराठ्यांनी पक्के मनावर घेतले आहे. त्यांनी कितीही जातीवाद केला तरी मराठा आणि ओबीसी बांधव गावखेड्यात एकमेकांचे चांगले मित्र आहेत. कारण सगळा समाज मराठा समाजासोबत आहेत. बंजारा समाजाच्या आरक्षणाला मराठा समाजाने पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आंदोलनातही आम्ही सोबत आहेत. छगन भुजबळ त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी दहा पाच लोक जमवतात. पण त्यांच्यासोबत बसणाऱ्या ओबीसी नेत्यांनी थोडे आत्मपरीक्षण केले, तर इतिहास भुजबळांनी जातीयवाद केला आहे. प्रचंड विश्वासघाती माणूस आहेत. त्यांना सांगणे आमचे काम आहे," असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
मराठा आरक्षणासंदर्भातील उपोषणादरम्यान, जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यावर राज्य सरकारकडून सविस्तर पत्रकार परिषद घेण्यात आली. यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. "यापूर्वीही पाच वर्षे मी गृहमंत्री होतो आणि जवळपास २ हजार आंदोलनं ही आरक्षणाच्या संदर्भातली झाली होती. परंतू कधीही आम्ही बळाचा उपयोग आम्ही केला नाही. आत्ताही बळाचा उपयोग करण्याचं कुठलं कारणच नव्हतं. सर्वात आधी ज्या निष्पाप नागरिकांवर या बळाच्या वापरामुळे इजा झाली आहे, जे जखमी झाले आहेत तर मी शासनाच्या वतीने क्षमा मागतो," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.