Manoj Jarange Patil Emotional Appeal: मराठा आरक्षणासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे मराठा आमदारांना साद घालताना भावनिक झाल्याचं चित्र हिंगोलीमध्ये पाहायला मिळालं. हिंगोलीमधून जरांगेंनी आजपासूनच मराठा आरक्षणासाठी शांतता रॅलीला सुरुवात केली. या रॅलीमधील पहिल्याच भाषणात मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आमदारांना मराठा आरक्षणासाठी समाजाच्या पाठीशी राहण्याचं आवाहन केलं. यावेळी बोलताना जरांगे-पाटील भावूक झाले.


'छगन तात्या म्हणले...'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"सरकारने आपल्या विरोधात अनेक मराठे उतरविले आहेत. ही मागणी टिकणार नाही म्हणत आहेत. हैद्राबाद आणि साताऱ्याचे गॅजेट लागणार आहे. काही म्हणतात सगेसोयरेच टिकणार नाही. ज्यांचं दुकान बंद पडलंय ते सरकारकडून बोलत आहेत," असा टोला जरांगेंनी लगावला. "13 टक्के, 16 टक्के आरक्षण मराठ्यांचं टिकू दिलं नाही. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून आरक्षण टिकू दिलं जात नाही. आता 10 टक्के लागू करण्याअगोदर कोर्टात याचिका दाखल केली," असं जरांगे म्हणाले. "छगन तात्या म्हणले कुणबीच्या नोंदी रद्द करा. काहीजण खोटं बोलले ते वाशीला होते. आता खोट बोलत आहेत. माझ्या चुका काहीजण शोधत आहेत. चूक कुणाकडून होत नाही. चूक काढायची ही वेळ नाही. ही वेळ समाजासोबत राहण्याची वेळ आहे. समाजावर संकट घोंघावत आहे. सरकारने आरक्षण नाही दिलं तर मुंबईला जायचं का? तुम्ही येणार का?" असा प्रश्न जरांगेंनी विचारला असता समोरच्या गर्दीतून होकारार्थी प्रतिसाद मिळाला. 


'आरक्षण असून ओबीसींचे नेते...'


"माझ्या समाजाला त्रास द्यायचा नाही. माझा सरकारला इशारा आहे. सरकार मराठयांच्या मुलांवर जाणूनबुजून खोट्या केसेस करत आहे. खोट्या केसेसला घाबरू नका. सगळ्या मराठ्यांच्या आमदारांना मी आवाहन करतो की, मराठ्यांच्या पाठीमागे खंबीर पद्धतीने उभे राहा. ठरलेल्या नऊ मागण्या तातडीने द्या. आरक्षण असून ओबीसींचे नेते ताकदीने उभे आहेत. माझ्या समाजाला तर आरक्षण नाही मग तुम्ही ही किती ताकदीने समाजाच्या पाठीमागे उभे राहायला हवं," असं जरांगे मराठा आमदारांना उद्देशून म्हणाले. 


नक्की वाचा >> ...तर 288 पैकी तुमचा एकही उमेदवार निवडून येणार नाही; भुजबळांचा उल्लेख करत जरांगेंचा इशारा


'माझी मराठ्यांना हात जोडून विंनती..'


"तुम्ही माझ्यावर कितीही खोटे आरोप करा पण मी जातीसाठी घाबरणार नाही. समाजाचा मुलगा म्हणून मी काम करतोय. माझं कुटुंब अक्षरश: उघड्यावर पडलं तरी मी मागे हटलो नाही. मग मला मराठेच का त्रास देत आहेत?" असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला. "माझी मराठ्यांना हात जोडून विंनती आहे, मला उघडं पडू देऊ नका. समाज मोठा होईपर्यंत मला उघडं पडू देऊ नका," असं म्हणत जरांगे पाटील भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.


समाजाचं रक्त पिऊन...


"यांनी मला एकटं पडायचं ठरवलं आहे. मराठ्यांचे लोक फोडून माझ्याविरोधात उभं करायचं. काही ही करा पण या पोराला बदनाम करा. काही लोक माझ्याबद्दल खोटं बोलतात. माझ्या जवळ काहीच नाही. माझ्या पोटात कपट नाही. मी कुणाशी खोटं बोलत नाही. मी निर्भीडपणे खरं बोलतो. पण समाजाचं रक्त पिऊन स्वतःचं संसार कुणी मोठा करू नये," असं जरांगे पाटील म्हणाले.