नितेश महाजन, झी मीडिया, जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील तिसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा पाचवा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालली आहे. उपोषणामुळे प्रकृती खालवल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मनोज जरांगे पाटील वारंवार वैद्यकीय उपचारास नकार देत असल्याने सरकारसमोर देखील मोठं आव्हान निर्माण झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत.गेल्या पाच दिवसांपासून जरांगे यांनी पाणी आणि औषधोपचार घेतलेले नाहीत. त्यामुळे त्यांची तब्बेत खालावली आहे. दरम्यान आज मराठा समाजाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोशल मीडियावरून महाराष्ट्र बंदची हाक दिलीय. त्यामुळे या बंदला राज्यातील अनेक भागात चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान समाजाने शांततेत आंदोलन करावं असं आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे.


तसेच जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याने डॉक्टरांनी त्यांच्याकडे धाव घेतली होती. मात्र तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांचा हात जरांगे यांनी झटकला. तपासणी करण्यासाठी जरांगे यांनी नकार दिला आहे. 


माझा जीव गेल्यावर सरकार राहिल का? - मनोज जरांगे पाटील


शिंदे फडणवीस मराठ्यांची फसवणूक करू लागले आहेत. 15 तारखेचे अधिवेशन 20 पर्यंत पुढे का ढकलले? उद्याच्या उद्या सगेसोयरे असा शब्द असलेला आरक्षणाचा कायदा करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. माझा जीव गेल्यावर सरकार राहिल का? महाराष्ट्र राहिल का असे म्हणत महाराष्ट्राची श्रीलंका होईल असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. 


मनोज जरांगेंचे आंदोलन कोणत्या मागण्यांसाठी सुरुय 


- सगे सोयरे शब्दाच्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करून त्याची अमंलबजावणी करा
- हा कायदा बवनण्यासाठी येणार्या दोन दिवसात विशेष अधिवेशन घ्या
- 57 लाख नोंदी सापडल्या त्यांना तातडीने प्रमाणपत्र द्या,त्यांच्या नातेवाईकांना शपथ पत्राच्या आधारे प्रमाणपत्र द्या
- ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या याद्या ग्रामपंचायतवर लावा
- बंद पडलेली शिबिरं पुन्हा सुरु करण्यात यावीत
- अंतरवालीसह राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या
- हैद्राबाद, बॉम्बे गॅझेट मधील नोंदी ग्राह्य धरा
- शिंदे समितीचे काम युद्ध पातळीवर सुरु ठेवून एक वर्षाची मुदतवाढ द्या
- मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून कायदा करा त्याची अंमलबजावणी करा


मनोज जरांगेच्या आवाहननंतर जालना बंद


महाराष्ट्र बंदला जालना जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळतोय. सकल मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलंय. मनोज जरांगे पाटलांच्या मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. जालना शहातील मुख्य बाजार पेठेतील सर्व दुकानं बंद ठेवून मराठा समाजाच्या आवाहनला प्रतिसाद दिलाय. 


मनमाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद


महाराष्ट्र बंद हाकेला नाशिकच्या मनमाडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. मराठा आरक्षणा अध्यदेशाचे शासनाने कायद्यात रूपांतर करावे अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. मनमाडसह नांदगावमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला.