सरकार विरुद्ध मराठा संघर्ष टाळला जाणार का? जरांगे म्हणाले, `मागे जी चूक झाली ती...`
Manoj Jarange Patil Government vs Maratha Fight: जरांगेच्या उपस्थितीमध्ये बीड शहरामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शहरामध्ये मोठी रॅलीही निघणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Manoj Jarange Patil Government vs Maratha Fight: मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारणारे कार्यकर्ते मनोज-जरांगे पाटील यांनी राज्यामधील शिंदे सरकारला दिलेली 24 डिसेंबरची मुदत उद्या संपत आहे. याच पार्श्वभूमीवर आज म्हणजे 23 डिसेंबर रोजी बीड शहरामध्ये इशारा सभा घेत आहेत. या सभेमध्ये जरांगे-पाटील आपली पुढील भूमिका काय असणार आहे हे स्पष्ट करणार आहेत. असं असतानाच दुसरीकडे जालन्यामधील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या जरांगे पाटील यांचं संभाव्य आंदोलन लक्षात घेत रद्द करण्यात आल्या आहेत. याबद्दलच जरांगे पाटील यांना सरकारने तुमच्या आंदोलनासाठी तयारी केली आहे असं म्हणत प्रश्न विचारला. त्यावर जरांगे पाटलांनी सरकारने यापूर्वी केलेली चूक न करण्याचा सल्ला दिला आहे.
फडणवीस, मराठा समाजाला टाळू नका
जरांगे-पाटील यांनी या पत्रकार परिषदेमध्ये थेट फडणवीस यांचा उल्लेख केला. बीडमधील कार्यकर्त्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीशींबद्दल विचारण्यात आलं असता जरांगे पाटलांनी फडणवीस यांना इशारा दिला. "तुम्ही शहाणपणाची भूमिका घ्या. तोडगा काढायची भूमिका घ्या," अशी विनंती जरांगे-पाटील यांनी फडणवीस यांना केली. "मी गृहमंत्री फडणवीस यांना पुन्हा एकदा सांगतो की मराठा समाजाला टाळू नका. त्याचं ऐकून तुम्ही मराठा समाजावर अन्याय करु नका. जरांगे-पाटील यांनी फडणवीस यांना, "याआधी तुम्ही एक डाव टाकला होता. तुम्ही किंवा तुमच्या सरकारनं म्हणा. त्यात काय झालं तुम्हाला माहितीय. पु्न्हा असा डाव टाकायचा प्रयत्न करु नका भयानक परिस्थिती होईल," असा इशारा दिला.
संघर्ष टाळला जाणार का?
जालन्यातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सरकार तुमच्या आंदोलनासंदर्भात तयारीत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे सरकार विरुद्ध मराठा समाज हा संघर्ष टाळला जाणार का? असा प्रश्न पत्रकाराने जरांगे-पाटील यांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना जरांगे-पाटील यांनी, "(हा संघर्ष टाळणार जाणार का) ते सरकारच्या हातात आहे. आम्ही कुठे संघर्ष करतोय? मी तेच सांगितलं मागे एक चूक झाली तीच पुन्हा करु नका. सामंजस्याने तोडगा काढायचा प्रयत्न करा. मागे जी चूक झाली ती पुन्हा करु नका. देशाला झालेलं हे डॅमेज कधीही भरून निघणार नाही.
मुंबईकडे कूच करणार का?
मुंबईकडे कूच करणार का? असा प्रश्न जरांगे-पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर जरांगे-पाटलांनी, "थोडं थांबा. मी सगळं सांगणार आहे. मायबाप समाजासमोर हिसाब किताब सगळं क्लिअर होणार," असं सूचक विधान 'इशारा सभे'आधी केलं.
शाळांना सुट्टी, पोलिसांची सुट्टी रद्द
मनोज जरांगे पाटलांची आज (23 डिसेंबर 2023) बीड शहरामध्ये इशारा सभा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जरांगेच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी शहरामध्ये मोठी रॅलीही निघणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे-पाटील हे 24 तारखेनंतर आंदोलन करणार असल्याची शक्यता असल्याने जालन्यातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा राक्षणासंदर्भात येत्या काही महिन्यांमध्ये निर्णय घेण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात जरांगे पाटील यांच्याशी गुरुवारी मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी भेटून चर्चा केली.