`आमच्या पाठीमागे कोण ते शोधून काढा अन्...`; राज ठाकरेंना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर
Manoj Jarange Patil on Raj Thackeray : राज ठाकरे यांनी जरांगे-पाटलांच्या आंदोलनामागे कोण आहे का? हे येणाऱ्या काळात कळेल, असं विधान ठाण्यात केलं होतं. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा (maratha aarakshan) मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी आरक्षणसाठी दोन वेळा आमरण उपोषण केल्यानंतर सरकारला अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील राज्यभर फिरून मराठा आरक्षणप्रश्नी सरकारला धारेवर धरत आहेत. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. जरांगे-पाटलांच्या आंदोलनामागे कोण आहे का? हे येणाऱ्या काळात कळेल, असं विधान राज ठाकरे यांनी ठाण्यात केलं आहे. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुका तसेच पदवीधर निवडणुकीच्या संदर्भात ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांची ठाणे इथल्या मनसे कार्यालयात बैठक घेतली. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना राज ठाकरे यांनी मनोज जरांगेच्या आंदोलनाबाबत भाष्य केले. मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळणार नाही, ही गोष्ट मनोज जरांगे-पाटील यांना भेटल्यावरच सांगितलं होती, असे राज ठाकरे म्हणाले होते.
काय म्हणाले राज ठाकरे?
"कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळणार नाही, ही गोष्ट जरांगे-पाटलांना भेटल्यावर सांगितली होती. मी आताही वेगळं काही सांगत नाही. जरांगे-पाटलांच्या आंदोलनामागे कोण आहे का? हे येणाऱ्या काळात कळेल. पण, आरक्षणामुळे जातीयवाद निर्माण करून राज्यातील कायदा-सुव्यवस्था भंग करायची कुणी ठरवली का? निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी सुरू झाल्या आहेत. मला हे सगळं चित्र सरळ दिसत नाही," असे राज ठाकरे म्हणाले होते.
मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर
छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. " राज ठाकरे असं का बोलताहेत कळायला मार्ग नाही. आमच्या पाठीमागे कोण आहे ते शोधून काढावं आणि सांगावं. सगळ्यांनी शोध घेतला आहे, तुम्हीही शोध घ्यावा. यापाठीमागे फक्त आणि फक्त मराठा समाज आहे. मराठा समाजातील मुलांचं कल्याण होत असल्यावर खोटे आरोप केले जातात. मराठा समाज कुणाचंही ऐकणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे," असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.