Maratha Reservation : मराठा आरक्षणावरुन राज्यात जोरदार राजकारण सुरु झालंय. मराठा आरक्षणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु झालीय. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केल्याने ओबीसी नेते चांगलेच संतापले आहेत. अशातच मनोज जरांगे यांच्या अल्टिमेटमला महाराष्ट्र सरकारने घाबरू नये आणि चुकीचा मार्ग स्वीकारू नये, तसेच इतर मागासवर्गीय सदस्यांवर अन्याय होता कामा नये, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"हा जनतेला न्याय आहे का? त्यांना गोरगरीब आठवत नाही,  तुम्ही कुणासाठी काम करता हे आम्हाला आता कळलंय तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही, तुम्ही सरड्या सारखे रंग बदलत आहात. तुमच्या सारखा विरोधी पक्ष देशात कुणी नाही, तुम्ही गायकवाड आयोगाला बोगस म्हटलेले, तुमची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी आहे. मी राजकारणासाठी करतो असे एकही मराठा ओबीसी म्हणू शकत नाही. तुम्हाला मराठा समाजविषयी माया नाही. आम्हाला तुम्ही सांगू नका काय करायचं. अभ्यास करायचा की नाही, आमच्या मुलांच्या बुद्धी ठेप्यावर आहे. तुम्ही सांगायची गरज नाही. आमच्या मुलांचे तुम्ही द्वेषी आहात. आम्ही स्वतःला हिरो मानत नाही," असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.


"तुम्ही आम्हाला संपवले होते. आम्हाला मोडायचा सामूहिक कट तुम्ही रचला होता. फालतू शब्द बोलून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करता. तुम्ही काय चीज आहे हे आम्हाला आता कळले आहे. तुम्ही 5 ते 6 जण काय नमुने आहेत हे आम्हाला कळलं आहे. तुम्ही तुमच्या पक्षाने आमचा वापर केला. तुम्ही आता आमचे मराठ्यांचे शत्रू झालात. मराठ्यांचे मुडदे पडायला तुम्ही जबाबदार आहात आणि तुम्ही आम्हाला सल्ले देताय. सल्ले देऊ नका. कुणबी पुरावे मिळतात म्हणून हे बरळत आहेत. आम्ही कसले हिरो, चष्मे घालतोय की धोतरावर इन करतोय. मराठे आता काही दिवसात तुम्हाला सल्ले शिकवतील आणि गर्व कुणाला झाला आहे लोकांना कळतंय.  तुम्हाला तुमच्या जातीविषयी गर्व झाला आहे. असला विरोधी पक्ष नेता असतो का? असले विचार करून तुमचा पक्ष कसा राहील, राहुल गांधींनी हेच शिकवलं का तुम्हाला. या साठी विरोधी पक्ष नेता बनवले का?," असाही सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे.


काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार?


"उपमुख्यमंत्र्यांपूर्वी मी भूमिका मांडली होती. जनगणना झाल्यावर कोणाची किती लोकसंख्या आहे कळणार आहे. गायकवाड आयोगाने 32 टक्के मराठा दाखवला तो इतर समाजाचाही आहे. लेवा मराठा आणि इतर 15 टक्के असावी. अनुसुचित जातीला आपण 13 टक्के, अनुसुचित जमातीला 7 टक्के देतो आणि ओबीसीला 30 टक्के असे 50 टक्के आरक्षण देतो. मात्र आता आम च्या समाजाची संख्या 80 टक्के घरात गेली आहे. उरलेले 20 टक्के शीख, जैन, मारवाडी, गुजराती हे नोकरीच्या भानगडीत पडत नाही. मग उरला मराठा समाज त्यांना दहा टक्के ईडब्लूएस मधून आरक्षण मिळत असेल तर तो फार मोठा फायदा आहे," असे विजय वडेट्टीवार म्हणाले.


"मात्र जरांगे पाटलांना हा फायदा उचलण्याऐवजी राजकीय फायदा उचलण्याची भूमिका असावी म्हणून ते आग्रही आहेत. मराठा युवा तरुणांचे मोठे नुकसान होणार आहे अभ्यास करून त्यांनी आपल्या भविष्याचा निर्णय घ्यावा. ओबीसीमध्ये येऊन त्यांना फारसा फायदा होणार नाही. नोकरांच्यामध्येही आणि सोयी सुविधांमध्ये त्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. त्यांनी अभ्यास करून काय याचा विचार करावा. मराठा नेत्यांबाबत मी काय बोलणार नाही. कुणाच्या डोक्यात काय खुळ आहे माहित नाही. गोळीबार झाला आणि जरांगे पाटील त्यानंतर हिरो झाले. आता या सगळ्या गोष्टी घडत आहे. समाजाचे पाठबळ मिळाल्यामुळे त्यांना गर्व झाला आहे.
धमक्यांनी प्रश्न सुटणार नाही हे जरांगे पाटलांना कळलं पाहिजे. कायद्याच्या चौकटीतच सगळं करावे लागणार आहे. त्यांच्या डोक्यात खूळ घुसलं असेल तर ते सातत्याने मागणी करतील," असे विजय वडेट्टीवार म्हणाले.