मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे सध्या राज्यभर दौरे करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी आणि आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्याच्या दृष्टीने त्यांचे हे दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांमध्ये ते मराठा बांधव आणि सहकाऱ्यांशी चर्चा करुन निवडणुकीची रणनीती आखत आहेत. त्यातच मनोज जरांगे सध्या बीड दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी जीवघेणा प्रवास करत सर्वांना श्वास रोखून धरायला भाग पाडलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोज जरांगे पाटील यांचा आज बीड जिल्हा दौरा होता. या दौऱ्यामध्ये ते सूर्याची वाडी या गावातून धुमाळवाडीकडे जात होते. धुमाळवाडीकडे जात असताना बिंदुसरा नदीला पूर आला होता. तरीही जरांगे पाटील यांनी या नदीतून गाडी टाकत जीवघेणा प्रवास केला. बीड जिल्हा पोलिसांकडून जरांगे पाटील यांना नेहमीच पोलीस सुरक्षा पुरवली जाते. परंतु आज स्कॉटिंग व्हॅन नसल्याने मनोज जरांगे या मार्गाने निघाले. नदीला पूर आला होता तरीही जरांगे पाटील यांच्या गाडीने या नदीमधून प्रवास केला. यावेळी उपस्थितांची धाकधूक वाढली होती. पण सुदैवाने ते सुखरुप बाहेर पडले.


मनोज जरांगे यांच्यासह कारमध्ये पोलीस कॉन्स्टेबलसह मराठा आंदोलकही होते. मनोज जरांगे यांची कार नदीच्या पाण्यात उतरवण्यापूर्वी सहकाऱ्यांनी दुसरी कार अगोदर पाण्यात उतरवली होती. ती कार सुखरुप पोहोचल्याची खात्री झाल्यानंतर मनोज जरांगे यांना कारमधून नदीपलीकडे नेण्यात आलं. दरम्यान, सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेवर बोलताना आपण 1 सप्टेंबर रोजी राजकोटला जाणार असून कोणीही या घटनेचं राजकारण करु नये, असेही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 


1 सप्टेंबर रोजी राजकोट किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करणार असल्याच मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. राजकारण करायला भरपुर जागा आहे, असंही जरांगे यांनी ठाकरे आणि राणे गटात झालेल्या राड्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.