औरंगाबाद: वाळूज तोडफोड प्रकरणात ३७ जणांना अटक, मराठेतर दंगलखोरांचाही समावेश?
अटक केलेल्या सर्वा आरोपींना १५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
औरंगाबाद: आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाने पुकारलेल्या बंददरम्यान, औरंगाबादच्या वाळूज तोडफोड प्रकरणात मराठेतर दंगलखोर असल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत या तोडफोड प्रकरणात ३७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात १३ जण हे मराठा समाजाचे नसून, इतर समाजाचे असल्याचं पुढं आलंय. या लोकांनीसुद्धा तोडफोड केल्याचं दिसतंय.
आरोपींना १५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
अटक केलेल्या सर्वा आरोपींना १५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीये. नक्की तोडफोड करण्यामागे त्यांचा काय हेतू होता याचा तपास पोलीस करत आहेत. या सगळ्यात औद्योगिक वसाहतीतील काही वाद किंवा इतर कोणतं कारण नाही ना याचाही शोध पोलीस घेत आहेत..
ओळख लपवण्यासाठी हल्लेखोरांनी तोंड लपवले
औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक वसाहती मध्ये जो काही हिंसाचार झाला. त्याचे काही सीसीटीव्ही फूटेज आता समोर येत आहेत. यात हिंसाचार करणारे ठरवून आले होते असं स्पष्ट दिसून येत आहे. ओळख पटू नये म्हणून हल्लेखोरांनी तोंडाला कपडे बांधले होते. व्हीडिओ मध्ये हल्लेखोर कसे येतात, कशा पद्धतीने जाळपोळ करतात हे स्पष्ट दिसताय, नासधूस करतानाचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. पोलीस आता या सीसीटीव्हीद्वारे हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
हिंसाचारात जवळपास ७० ते ८० कोटींचे नुकसान
दरम्यान, या वेळी झालेल्या झालेल्या हिंसाचारात जवळपास ७० ते ८० कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एकूण जवळपास ८० कंपन्यांमध्ये तोडफोड झालीये.. आतापर्यंत त्यापैकी केवळ ५५ कंपन्यांच्या नुकसानीने पंचनामे झालेत.. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढून १०० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत पोलिसांनी ४५ लोकांना ताब्यात घेतलंय.. तर ३७ लोकांना अटक दाखवण्यात आली आहे.