मराठा आरक्षणाला स्थगिती, जालन्यात बसची तोडफोड
मराठा आरक्षणाला अंतरीम स्थगिती मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी बसच्या काचा फोडल्या आहेत.
नितेश महाजन, झी मीडिया, जालना : मराठा आरक्षणाला अंतरीम स्थगिती मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी बसच्या काचा फोडल्या आहेत. जालन्यातील घनसावंगी शहरजवळ ही घटना घडलीय.बसमधील प्रवाशांना बसच्या खाली उतरवून देत ही तोडफोड करण्यात आलीय.
अंबड आगाराच्या बसवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या आहेत. ही दगडफेक नेमकी कोणत्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली याची नेमकी माहिती समोर आलेली नाही. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला अंतरीम स्थगिती दिल्याने नाराज झालेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणाची मागणी करत बसच्या समोरील आणि मागील बाजूच्या काचा फोडल्या आहेत. यामध्ये बसचे नुकसान झालंय. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
दुसरीकडे सोलापूर-पुणे महामार्गावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून आंदोलन केलं. मराठा आरक्षण जोवर मिळत नाही तोवर मराठा समाजातील युवक शांत बसणार नसून गनिमी कावा पध्दतीने हे आंदोलन करतच राहणार असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी दिलीय.
टायर जाळल्यानंतर कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत जवळपास अर्धा तास महामार्ग रोखून ठेवला होता. अर्धा तास वाहतूक खोळंबली होती मात्र कोणतीही पोलीस यंत्रणा तेथे पोहोचली नव्हती.
सोलापुरात अवंतीनगरमध्ये मराठा आरक्षणाच्या स्थगिती विरोधात मराठा युवकांचा पाण्याच्या टाकीवर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याच्या टाकीवर चढण्या आधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.