उपोषण थांबवा, आम्ही तुमच्यासोबत आहोत; संभाजी भिडेंची जरांगेंना विनंती
Maratha Reservation: आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या सरकारच्या भूमिकेचं मनोज जरांगेंनी स्वागत केलंय. मात्र सरकारला आणखी वेळ कशासाठी हवा आहे असाही सवाल त्यांनी केलाय. आपण दोन पावलं मागे येऊ मात्र ठोस निर्णय व्हायला हवा अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिलीय.
Maratha Reservation: राज्य सरकारच्यावतीने सर्व गोष्टी तुमच्या म्हणण्याप्रमाणे सकारात्मक घडत आहेत.त्यामुळे उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे यांना केली. मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं असा ठराव सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आलाय. तसच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय. लाठीचार्जप्रकरणी तीन अधिका-यांचं निलंबन करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री शिंदेंनी दिलीय. जरांगे पाटील यांनी आता सरकारला वेळ द्यावा अशी विनंती जरांगे पाटील यांना करण्यात आली. सरकारला आपल्या तब्येतीची काळजी आहे. त्यामुळे तुम्ही हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती करण्यात आली. याला मनोज जरांगे यांनी उत्तर दिले.
आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या सरकारच्या भूमिकेचं मनोज जरांगेंनी स्वागत केलंय. मात्र सरकारला आणखी वेळ कशासाठी हवा आहे असाही सवाल त्यांनी केलाय. आपण दोन पावलं मागे येऊ मात्र ठोस निर्णय व्हायला हवा अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिलीय.
मनोज जरांगे यांनी चालवलेले उपोषण कौतुकास्पद आहे. आज ना उद्या याला यश नक्कीच येणार हे शंभर टक्के आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मराठा आरक्षण दिल्याशिवाय शांत राहणार नाहीत, असे संभाजी भिडे यांनी सांगितले. राजकारणी लोकांकडून आपल्याला हवे ते करुन घेण्याची जबाबदारी मनोज जरांगे यांनी घेतली आहे. हे उपोषण खूपच कौतुकास्पद असल्याचे संभाजी भिडे म्हणाले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीत शंभर टक्के तथ्य आहे असेही ते म्हणाले.
दरम्यान संभाजी भिडे यांच्या उपस्थितीमुळे माझ्या आंदोलनाला बळ मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.दरम्यान संभाजी भिडे यांच्या भेटीनंतर जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मनोज जरांगेंची भूमिका
"मी याआधीही त्यांना वेळ दिला होता. मी वेळ देतोय पण मागे हटणार नाही. अजिबात संभ्रमात राहायचं नाही. महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हातात पत्र पडल्याशिवाय मी आंदोलन बंद करत नाही. तुम्ही फक्त आरक्षणावर लक्ष्य केंद्रीत करा," असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.
"जे गाव महाराष्ट्रासाठी लढत आहे त्यांनी या 15 दिवसात माझ्याकडे काही मागितलेलं नाही. पण आता दोन महिन्याच्या लेकरालाही आंदोलनात घेऊन आले आहेत. महिला, सगळ्या गावाने चूल बंद केली असून, आम्हीपण जेवणार नाही म्हणत आहेत. आम्हाला तुम्हीही पाहिजे, आणि आरक्षणही पाहिजे असं ते म्हणत आहेत," असं मनोज जरांगे म्हणाले.
दरम्यान सोमवारी मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजास सरसकट आरक्षण देण्यात यावे, ही आपली मागणी आहे. राज्य सरकार मराठवाडय़ातील आरक्षणाच्या संदर्भात ज्यांच्याकडे निजामकालीन पुरावे आहेत त्यांना आरक्षण देणार असेल तर पश्चिम महाराष्ट्राने तुमचे घोडे मारले आहे काय?
"मराठा समाज आणि पोरांना न्याय द्यावा,आमचा कुणीही समितीत असणार नाही. सरसकट गुन्हे मागे घेतले असतील तर सरकारचं मराठा समाजाकडून स्वागत. मी सरकार, विरोधक कुणालाही घाबरत नाही. मराठ्यांना घाबरतो आणि दबतो. आता माझ्यात निर्णय घेण्याची क्षमता राहिलेली नाही. सरकारला कशासाठी वेळ हवा हे बघतो. त्यांचाही कुणीतरी माझ्याकडे येईल. तुम्ही खरोखर टिकणारं आरक्षण देण्यासाठी वेळ मागताय की आंदोलन मोडून काढण्यासाठी वेळ मागताय हे आम्हाला कळायला हवं. सरकार टिकणारं आरक्षण देणार असेल तर सरकारला आणखी वेळ द्यायला तयार," असंही ते म्हणाले होते.