शरद पवार, भाजप की आणखी कोणी, `या` तारखेला मनोज जरांगे सांगणार कोण आहे बोलवता धनी?
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील प्रकाशझोतात आल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांचा बोलवता धनी कोण हा प्रश्न विचारला जातोय. आता खुद्द जरांगेच त्यांचा गॉडफादर कोण हे सांगणार आहेत. यासाठी त्यांनी तारीखही जाहीर केली आहे.
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांच्यावर कुणाचा तरी वरदहस्त आहे, त्यांचा गोडफादर कोण, जरांगेंचा बोलवता धनी कोण अशा चर्चा सुरु आहेत. जरांगेंच्या पाठिशी राष्ट्रवादी ते भाजप असे अनेक पक्ष असल्याच्या थिअरी मांडल्या गेल्यात. आता जरांगेंच त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे सांगणार आहेत. 24 तारखेनंतर आपला बोलावता धनी कोण हे सांगतोच अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केलीय. काहीच दिवसांपूर्वी जरांगे कुणाचं खातात असं म्हणत छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) निशाणा साधला होता. जरांगेंच्या पाठी कोणती शक्ती आहे असाच रोख भुजबळांचा होता.
राज ठाकरे यांनीही केला आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे कोण आहे, त्यांचा बोलवता धनी कोण ?हे कालांतराने कळेल असे सांगून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे जातीपातीचे राजकारण करणारे अदृश्य शक्ती असल्याचं म्हटलं होतं.
पहिल्या दिवसापासूनच जरांगे-पाटलांचा गॉडफादर कोण ही चर्चा सुरु आहे. जरांगेंच्या पाठिशी शरद पवार (Sharad Pawar) आहेत इथपासून जरांगेंच्या पाठिशी भाजप आहे. इथपर्यंत चर्चा आजवर रंगल्यात. विशेषत सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत सारेच जरांगेंच्या पाठिशी कोण असा सवाल विचारत आहेत. त्यामुळेच 24 तारखेनंतर सांगतो पाठिशी कोण असं म्हणत जरांगेंनीही टोला लगावलाय.
भुजबळांची बोचरी टीका
मनोज जरांगे आणि छगन भुजबळांमधलं आरक्षण युद्ध काही केल्या थांबत नाहीय. आता दादागिरीला दादागिरीनंच उत्तर दिलं जाईल, असा इशारा भुजबळांनी जरांगेंना दिलाय. इंदापुरात भुजबळांनी ओबीसी मेळाव्याला संबोधित केलं. तर अजित पवारांनी भुजबळांना पुन्हा समज द्यावी, असा पलटवार जरांगेंनी केलाय. जरांगेंची अक्कल दिव्यांग आहे, अशी टीका भुजबळांनी केलीय. इंदापूरच्या सभेत भुजबळांनी जरांगेंची नक्कल केली. जरांगेंनी नारायण कुचेंवर व्यंगात्मक टीका केली. त्याची ऑडिओ क्लिप भुजबळांनी इंदापूरच्या सभेत ऐकवली. तर भुजबळांच्या या टीकेनंतर जरांगेंनीही पलटवार केलाय.
जरांगेंची तब्येत बिघडली
मनोज जरांगेंची प्रकृती बिघडलीय. धाराशिवमधल्या माकणीमध्ये जरांगेंची सभा सुरू होती. त्यावेळी त्यांची प्रकृती बिघडलीय. भाषण सुरू असताना जरांगेंना चक्कर आली. जरांगे यांना अशक्तपणा जाणवतोय. जरांगेनी अखेर व्यासपीठावर खाली बसून भाषण केलं. डॉक्टरांनी व्यासपीठावर येऊन जरांगेंची तपासणी केली. जरांगेंना विश्रांतीचा सल्ला देण्यात आलाय. जरांगेंनी पुढचे 5 दिवस विश्रांती घेतली नाही, तर किडनीवर परिणाम होऊ शकतो, अशी माहिती डॉक्टरांनी दिलीय.