`भुजबळांचं सर्व माहितीय` बालेकिल्ल्यात मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट
Maratha Reservation : मनोज जरांगे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा आजचा 8 वा दिवस आहे. नाशिकला त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन घेऊन जरांगेंनी आजच्या दिवसाची सुरुवात केली. मंत्री छगन भुजबळांच्या नाशिक जिल्ह्यात 2 सभा घेऊन जरांगेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं
Maratha vs OBC Reservation : मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ हा वाद दिवसेंदिवस चिघळत चाललाय. विशेषत बीड हिंसाचार आणि ओबीसी आरक्षण मेळाव्यापासून तर दोघेही एकमेकांविरुद्ध हमरीतुमरीवर आलेत. याच वादादरम्यान जरांगेंनी (Manoj Jarange Patil) तिसऱ्या टप्प्यातला आपला महाराष्ट्र दौरा अचानक बदलला आणि भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) नाशिककडे मोर्चा वळवला. भुजबळांच्या बालेकिल्ल्यात जरांगेंचा सभांचा धडाका सुरु आहे. त्र्यंबकेश्वरच्या सभेतून जरांगेंनी भुजबळांना गर्भित इशारा दिलाय. भुजबळांनी कुणाचा बंगला हडप केला आणि मुंबईत काय काय केलं, ते सारं ठाऊक असल्याचं जरांगेंनी म्हटलंय.
काय म्हणाले जरांगे
त्र्यंबकेश्वरच्या (Trimbakeshwar) सभेतून जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधला. भुजबळ कुठे भाजी विकत होते, कुणाच्या येथे काय करत होते, त्यांनी कुणाचा बंगला हडप केला हे सर्व मला ठावूक आहे. मी बोलायचं थांबलो तर त्यांनी सुरू केलं. आता नोंदी सापडल्या तर त्यांनी गप्प बसलं पाहिजे. मात्र, लोकांना गोळा करण्याचं काम सुरू असल्याचा टोला जरांगेंनी भुजबळांना लगावलाय.
त्र्यंबकेश्वर मंदिरात हजारो कुणबी नोंदी आढळल्यायत. कुणबी नोंदी असलेले पुरावे 10 ते 20 खोल्या भरून असल्याचा दावा तिथल्या पुरोहितांनी केलाय. देशभरातून पूजा करण्यासाठी आलेल्यांची पुरोहित या नोंदी ठेवत होते. त्यावेळीच्या या नोंदी आहेत. मराठा कुणबी नोंदींची जरांगेंनीही तपासणी केली. त्र्यंबक राजाने मराठ्यांना खजिना दिलाय, त्यामुळे सरकारने आता नोंदी तपासून आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगेंनी केलीय.
जरांगे-भुजबळ वाद चिघळला
बीड हिंसाचारानंतर भुजबळ जरांगेंविरोधात आक्रमक झाले आणि त्यानंतर दोघांमधला वाद आणखी पेटला. भुजबळांनी अंबडच्या सभेतून जरांगेंचा एकेरी उल्लेख केला होता, त्यानंतरच्या प्रत्येक सभेत जरांगे भुजबळांचा एकेरी उल्लेख करतायत. त्यामुळे जरांगे विरुद्ध भुजबळ हा वाद दिवसेंदिवस आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत.
नाशिकमध्ये जंगी स्वागत
छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात आज मनोज जरांगेंच्या सभा झाल्या. या सभेपूर्वी जरांगेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. सातपूरमध्ये मनोज जरांगेंना क्रेननं हार घालून स्वागत करण्यात आलंय. त्यानंतर नाशिकमध्येही मराठा समाजाकडून जरांगेंवर फुलांची उधळण करून जंगी स्वागत केलं. दरम्यान नाशिकमध्ये त्यांच्या स्वागतासाठी उभारलेल्या स्टेजवर मोठी गर्दी झाल्यानं जरांगेंनी स्टेज सोडून जनतेत उभं राहण्याचा निर्णय घेतला..
मनोज जरांगेंनी नाशिकमधल्या भगूरला भेट दिली. भगूरमध्ये जरांगेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं. जरांगेंवर फुलांची उधळण करत भगूरकरांनी स्वागत केलं. जरांगेंच्या स्वागताला मोठी गर्दी होती. यावेळी भव्य रोड शो करण्यात आला. तसंच बाईक रॅलीही आयोजित करण्यात आली. भगूर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं गाव. या गावात जरांगेंचं भव्य दिव्य असं स्वागत झालं.