मुंबई : जळगाव शहरात सरकारी वसतीगृहातील महिला आणि मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. पोलिसांकडून वसतीगृहातील महिलांना आणि मुलींना कपडे काढून नाचवण्यात येत असल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत आज माहिती दिली आहे. त्यांनी विधानसभेत बोलताना पोलिसांना क्लिनचीट दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारतर्फे चालवण्यात येणाऱ्या महिला आणि बालकल्याण विभागाचे निराधार आणि अत्याचारग्रस्त महिलांच्या मुलींच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली जाते. या वसतीगृहातील महिला आणि मुलींना विवस्त्र करून पोलिसांनी आणि अज्ञात व्यक्तींनी नाचविण्यात आल्याची माहिती समोर आली होती.


राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने याप्रकरणाची दखल विधानसभेत घेतली गेली. विरोधकांनी याप्रकरणी सरकारकडे प्रश्नांची सरबत्ती लावली. त्यानंतर आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी अधिकृत उत्तर विधानसभेत मांडले. 


'महिला वसतीगृहात पुरूष पोलीस जाऊ शकत नाही, तक्रारदार महिला वेडसर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पोलिसांनी कोणताही व्हिडिओ शूट केला नाही', असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. कालपासून पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले जात असताना गृहमंत्र्यांच्या क्लिनचीटमुळे आता विरोधक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


दरम्यान, जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक प्रवीण मुंडे यांनी देखील संबधित प्रकरणात पोलीसांचा संबध आढळून येत नसल्याचे म्हटले आहे.