यवतमाळ: लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण अनुचित पद्धतीने रद्द करणे ही अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह बाब होती. आयोजकांकडून ही गंभीर चूक घडल्याचे आम्हाला मान्य आहे. मराठी साहित्य संमेलन साहित्यबाह्य शक्तींच्या ताब्यात जातेय, हे आयोजकांनी वेळीच ओळखले नाही. त्यानंतर साहित्याशी किंवा भाषेच्या समृद्धतेशी ज्यांचा काडीचाही संबंध नाही, अशांपुढे आयोजकांनी नमते घेतले. ही गोष्ट आपल्याला शोभत नाही, असे परखड मत ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरूणा ढेरे यांनी व्यक्त केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाची नव्वदी पार केलेल्या नयनतारा सहगल इतक्या दूर संमेलनाला येणार होत्या. त्यांना याठिकाणी मोकळेपणाने त्यांचे विचार मांडून द्यायला पाहिजे होते. हे विचार आपल्या विवेकबुद्धीने स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे स्वातंत्र्य आपल्याला होते. मात्र, आपण या सगळ्याकडे त्यादृष्टीने पाहू शकलो नाही. संमेलन ही भाबड्या वाचकांना भडकावण्याची जागा नव्हे. आपण भले सामान्य असू, पण सुसंस्कृत आणि वाचणारी माणसे आहोत. त्यामुळे स्वत:च्या शक्तीवर विश्वास ठेवून असे प्रकार घडू न देणे, ही आपली जबाबदारी असल्याची आठवण अरुणा ढेरे यांनी साहित्यिक आणि वाचकांना करुन दिली. 


तसेच विचारवंतांनी कायम सावध राहणे गरजेचे आहे. इतिहास मोठा आहे अभिमास्पद आहे, मात्र, वेदनादायी आहे हेही लक्षात ठेवलं पाहिजे. भविष्य महत्त्वाचं आहे माणूस आणि माणुसकी मोठी आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. कलावंत आणि साहित्यिकांच्याबाबतीत मृत गोष्टी गळून पडल्या पाहिजेत, जुने विचार, जुन्या जाणीवा साहित्यिकांनी झटकून टाकल्या पाहिजेत. आपल्या संवेदना कोरड्या पडू नयेत याचीही काळजीही साहित्यिकांनी घेतली पाहिजे. कोणत्याही तत्त्वज्ञानाशी साहित्यिकाची बांधिलकी नसते. साहित्यिकाशी बांधिलकी त्याच्या जगण्याशी असते. कलेच्याद्वारे येणारा मुक्ततेचा अनुभव हा कलाकाराचा ध्यास असतो असेही मत ढेरे यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केले.


या संमेलनाला सुरुवातीला उद्घाटक म्हणून प्रख्यात इंग्रजी साहित्यिका नयनतारा सहगल यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, स्थानिक राजकारण्यांच्या दबावामुळे आयोजकांनी परस्पर नयनतारा सहगल यांना संमेलनाला न येण्याचा निरोप धाडला होता. यानंतर साहित्यवर्तुळातून महामंडळ आणि आयोजकांवर सडकून टीका झाली होती.