लेखिका कविता महाजन यांचे पुण्यात निधन
मराठीतील संवेदनशील लेखिका आणि कवयित्री कविता महाजन यांचे निधन.
पुणे : मराठीतील संवेदनशील लेखिका आणि कवयित्री कविता महाजन यांचे आज संध्याकाळी पुण्यात निधन झाले. कविता महाजन या न्यूमोनियाच्या आजाराने त्रस्त होत्या. बाणेर येथील चेलाराम रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्या ५१ वर्षांच्या होत्या.
महाजन यांना गेल्या आठवड्यापासून ताप होता. त्याशिवाय काही दिवसांपासून खोकला आणि दम लागत होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील बावधन भागातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
दरम्यान, हॉस्पिटलने त्यांच्या एच१एन१ ची चाचणी निगेटिव्ह आली. न्यूमोनिया झाल्यामुळे उपचारादरम्यान महाजन यांचे निधन झाल्याचे खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले. महाजन यांच्या पश्चात मुलगी, वडील असा परिवार आहे. लेखिका, कवयित्री आणि समाजजीवनाच्या अभ्यासक अशी ओळख असणाऱ्या महाजन यांच्या निधनाने साहित्य विश्वात शोक व्यक्त होत आहे.
महाजन यांचा जन्म ५ सप्टेंबर १९६७ रोजी नांदेड येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयामध्ये झाले. नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. मराठी साहित्य या विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली होती.
कविता महाजन यांची 'ब्र' ही कादंबरी गाजली. 'ब्र' इतक्याच त्यांच्या 'भिन्न', 'कुहू' अशा अनेक कादंबरीदेखील गाजल्या. ‘ब्र’ कादंबरीसाठी त्यांना मानाच्या साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
महाजन यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात काम उभे केले होते. आदिवासी समाजजीवनाचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. आदिवासी समाज व महिला यांचे प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले. आपल्या लेखनातून या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले.