अकोला : जम्मू काश्मीरमधल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले अकोल्याचे जवान सुमेध गवई यांच्या पार्थीवावर, दुपारी दोन वाजण्याच्या सुमाराला लोणाग्रा गावात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीला गृह राज्यमंत्री रणजित पाटील, आमदार बळीराम शिरस्कार, महार रेजिमेंटचे वरिष्ठ अधिकारी आणि सरकारी तसंच पोलीस अधिकारी उपस्थित होते. 


या वीरपुत्राला पोलीस प्रशासन आणि महार रेजिमेंटतर्फे मानवंदना दिली गेली. हजारोंच्या संख्येने यावेळी गावकरी उपस्थित होते. गावाच्या सुपुत्राला अखेरचा निरोप देताना अख्खा गाव शोकाकुल झाला होता. काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यातल्या झैनापोरा भागात शनिवारी लष्कर आणि अतिरेक्यांत चकमक झाली होती. तब्बल १८ तास चाललेल्या या धुमश्चक्रीत अकोल्याचे सुमेध गवई आणि तामिळनाडूचे इलया राजा यांना वीरमरण आलं.