Matheran Toy Train Mishap: ओडिशामधील रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरुन गेला असतानाच या दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी (3 जून 2023) रोजी माथेरानमधील टॉय ट्रेनचाही (Matheran Toy Train) अपघात होता अशी बातमी समोर आली आहे. माथेरान ते नेरळदरम्यान धावणारी ही टॉय ट्रेन रुळावरुन उतरली. जुम्मापट्टी रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. मात्र या अपघातानंतर माथेरान टॉय ट्रेनची सेवा पुढील 3 महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहे.


नेमका कसा घडला अपघात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही ट्रेन माथेरानवरुन नेरळ स्थानकाकडे जात असतानाच गाडी रुळावरुन घसरली. हा अपघात झाला तेव्हा गाडीमध्ये 95 प्रवासी होते. मात्र सुदैवाने ट्रेनचा वेग कमी असल्याने कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही असं मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. प्रवाशांना इतर वाहनांच्या मदतीने गंतव्यस्थानावर पोहचवण्यात आलं. अपघातानंतर जवळजवळ साडेतीन तासांनंतर म्हणजेच रात्री 9 वाजता रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना ही रुळावरुन घसरलेली ट्रेन पुन्हा ट्रॅकवर आणण्यात यश आलं. ही ट्रेन रात्री साडेदहाच्या सुमारास नेरळ स्थानकात दाखल झाली. 


सेवा राहणार बंद


नेरळ आणि माथेरानदरम्यानची टॉय ट्रेन ही 100 वर्षांहून जुनी आहे. मागील अनेक वर्षांपासून पावसाळ्याच्या कालावधीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने ही ट्रेन सेवा बंद ठेवली जाते. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण मान्सूनच्या कालावधीमध्ये ही सेवा बंद राहणार आहे. 10 जूनपासून 15 ऑक्टोबरपर्यंत माथेरानची टॉय ट्रेन बंद राहणार आहे. दरवर्षी या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळेच ही सेवा बंद ठेवली जाते. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार माथेरान ते अमन लॉजदरम्यानची सेवा सुरु राहणार आहे. नियमित प्रवासी वाहतूक करणारी आणि एक सामान वाहून नेणारी फेरी सोमवार ते शुक्रवारदम्यान माथेरान आणि अमन लॉजदरम्यान चालवली जाणार आहे, असं मध्य रेल्वेने म्हटलंय. विकेण्डलाही अगदी मोजक्या फेऱ्या सुरु राहणार आहे. दरवर्षी रेल्वेकडून पावसाळा सुरु झाल्यानंतर ही सेवा बंद केली जाते. मात्र यंदा 3 जून रोजी झालेल्या अपघातानानंतर हा निर्णय लवकर घेण्यात आल्याचं समजतं.


ओडिशा अपघाताने देश हादरला


ओडिशामध्ये 2 जून रोजी झालेल्या भीषण अपघातामध्ये 275 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 1200 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर तब्बल 51 तासांनी या मार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आली होती. या अपघाताचा तपास सध्या सीबीआयकडून केला जात आहे.