नेरळ : माथेरानची राणी अशी ओळख असणारी माथेरानची मिनी ट्रेन शुक्रवारपासून पुन्हा सुरु होणार आहे.


अपघातानंतर बंद होती सेवा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मे २०१६ मध्ये झालेल्या एकामागेएक अशा दोन अपघातांनंतर मिनी ट्रेनची नेरळ ते माथेरान अशी थेट सेवा बंद करण्यात आली होती. ही मिनी ट्रेन सुरू करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन काम करीत होतं. दरम्यान, पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या माथेरानच्या राणीचा शुक्रवारपासून नेरळ ते माथेरान प्रवास सुरू होणार आहे.


पर्यटकांना आणि स्थानिकांना दिलासा


माथेरानची मिनी ट्रेन सुरु होणार असल्याने प्रवाशांना, पर्यटकांना आणि येथील स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


... म्हणून सेवा बंद होती


माथेरानच्या मिनी ट्रेनचा दोन वेळा झालेल्या अपघातानंतर ही सेवा दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर ३० ऑक्टोबरपासून अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरू करण्यात आली होती.


असं असेल वेळापत्रक


आता शुक्रवार (२६ जानेवारी) पासून नेरळ-माथेरान प्रवास सुरू होणार असून नेरळहून मिनी ट्रेन सकाळी १०.३० वाजता निघणार आहे. ही ट्रेन अमन लॉजला दुपारी १.३५ वाजता तर माथेरानला दुपारी २ वाजता पोहोचेल.


शुक्रवारी या फेऱ्या रद्द


परिणामी यामध्ये अमन लॉज ते माथेरान (५२१५५ आणि ५२१५७) असणारी शटल सर्व्हिस अमन लॉजहून सुटणारी दुपारी ४.१५ आणि सायंकाळी ५.२५ तर माथेरानहून (५२१५८) दुपारी ४.५० वाजता सुटणाऱ्या या फेऱ्या शुक्रवारी रद्द करण्यात आल्या आहेत. 


मात्र, शनिवारपासून नेरळ-माथेरान नियमित फेऱ्या सुरू होणार असून ५२१०१ ही ट्रेन नेरळहून सकाळी ६.४० वाजता निघणार असून माथेरानला सकाळी ९.४० वाजता पोहचणार आहे. तर, परतीची फेरी ५२१०२ ही ट्रेन माथेरानहून ३.३० वाजता सुटणार असून नेरळला सायंकाळी ६.३० वाजता पोहचणार आहे. 


या मिनी ट्रेनला तीन सेकंड क्लासचे डबे, एक फर्स्ट क्लासचा डबा आणि दोन ब्रेक वँन जोडण्यात आले आहेत.