McDonald's Menu Issue: जगातील सर्वात मोठ्या चैन रेस्तराँपैकी एक असलेल्या ‘मॅकडोनॉल्ड’ने एक मोठा निर्णय घेतला आहे. ‘मॅकडोनॉल्ड’मधील पदार्थांमध्ये प्रत्यक्ष खरं ‘चीज’ न वापरता ‘चीज’सदृश्य पदार्थांचा वापर केला जात असल्याचा नुकताच खुलासा झाला. अन्न व सुरक्षा प्रशासनाच्या तपासणीदरम्यान ही बाब समोर आली. खरं चीज वापरत नसताना त्याचा उल्लेख पदार्थ विकण्यासाठी करणं हे नियमांना धरुन नसल्याचा ठपका अन्न व सुरक्षा आयुक्तांनी ठेवला. त्याच अनुषंगाने ‘मॅकडोनॉल्ड’ने एक महत्तवाचा निर्णय घेतला आहे. अन्न व सुरक्षा आयुक्तांनी ‘मॅकडोनॉल्ड’ला सर्वच पदार्थांच्या नावातून ‘चीज’ हा शब्द काढून टाकण्याचे आदेश दिलेले. त्यानुसार ‘मॅकडोनॉल्ड’ने पदार्थांतून ‘चीज’ शब्द काढून टाकत पदार्थांची नवी नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे आतापर्यंत ‘मॅकडोनॉल्ड’मध्ये ‘चीज’च्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.


नक्की प्रकरण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'चीज'च्या नावाखाली ग्राहकांची फसवणुक होत असल्याचा हा प्रकार अहमदनगर येथील ‘मॅकडोनॉल्ड’च्या रेस्तराँमध्ये समोर आला. येथील रेस्तराँमध्ये मिळणाऱ्या ‘मॅकडोनॉल्ड’च्या विविध पदार्थांमध्ये चीजसदृश्य पदार्थ वापरला जात होता. याबाबत अन्न व सुरक्षा आयुक्तांनी नेमलेल्या क्वालिटी कंट्रोल ऑफिसर्सने ‘मॅकडोनॉल्ड’ला या प्रकरणामध्ये कारणेदाखवा नोटीस बजावलेली. या नोटिशीनंतरही रेस्तराँकडून काहीही कार्यवाही केली जात नव्हती. त्यामुळे अहमदनगरमधील अन्न व सुरक्षा प्रशासनातील अधिकारी राजेश बढे आणि डॉ. बी. डी. मोरे यांनी ‘मॅकडोनॉल्ड’ला कारवाईचा इशारा दिला होता. अन्न व सुरक्षा आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याने ‘मॅकडोनॉल्ड’मधील या पदार्थांची विक्री थांबविण्याचा इशारा देण्यात आला. पदार्थांची विक्री बंद होईल या भीतीने अखेर ‘मॅकडोनॉल्ड’ रेस्तराँचं व्यवस्थापन पाहणाऱ्या हार्डकॅसल रेस्तराँ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अखेर अन्न व सुरक्षा प्रशासनाला रिप्लाय दिला. कंपनीने पदार्थांची नावे बदलल्याचे आणि नावांमधून 'चीज' शब्द काढून टाकल्याचे पत्र या अधिकाऱ्यांना दिले आहे.


राज्यभरात लागू


हा सारा प्रकार अहमदनगरसाठी मर्यादीत असला तरी ते राज्यातील सर्वच ‘मॅकडोनॉल्ड’च्या रेस्तराँना तो लागू होणार आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी ‘मॅकडोनॉल्ड’च्या रेस्तराँमध्ये खरं 'चीज' वापरलं जात नसलं तर पदार्थांच्या नावात चीज असा उल्लेख टाळावा या आदेशाची कोटेकोर अमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगितले. या रेस्तराँमधून प्रत्यक्षात चीजच्या नावाखाली चीजसदृश्य पदार्थ दिला जात होता.


पदार्थांची नावे बदलली -


बदलेलं नाव (कंसात जुनी नावे)


वेज नगेटस (चीझी नगेटस)


चेड्डार डिलाईट वेज - नॉनवेज बर्गर (मॅक चीज वेज - नॉनवेज बर्गर)


अमेरिकन वेज बर्गर (कॉर्न अॅण्ड चीज बर्गर)


अमेरिकन नॉन-वेज बर्गर (ग्रील्ड चिकन अॅण्ड चीज बर्गर)


ब्ल्यु बेरी केक (ब्ल्यु बेरी चीज केक)


इटालियन वेज- नॉन वेज बर्गर (चीजी इटालियन वेज- नॉन वेज बर्गर)


‘मॅकडोनॉल्ड’चं म्हणणं काय?


या प्रकरणावर ‘मॅकडोनॉल्ड’ने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “महाराष्ट्रातील मॅकडोनाल्‍ड्स स्टोअर्समधील आमच्या मेन्‍यूमधून 'चीज' हा शब्द काढून टाकल्याच्या अलीकडील बातम्यांबद्दल आम्ही आमच्या ग्राहकांना आश्वस्त करु इच्छितो की आम्ही आमच्या सर्व उत्पादनांमध्ये फक्त शुद्ध (रिअल) दर्जेदार चीजच आम्ही वापरतो," असं ‘मॅकडोनॉल्ड’ने म्हटलं आहे. तसेच, "आम्ही या विषयावर संबंधित अधिकाऱ्यांसोबत सक्रियपणे काम करत आहोत. आमच्या पदार्थांच्या घटकांमधील पारदर्शकतेबद्दल आमची वचनबद्धता आणि आमच्या ग्राहकांना स्वादिष्ट, उच्च दर्जाचे खाद्यपदार्थ देण्‍याप्रतीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असंही ‘मॅकडोनॉल्ड’ने सांगितलं आहे.