चंद्रपूर : जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरु आहे. या व्हायरसने भारतातही पसरण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत असून हा आकडा 100वर पोहचला आहे. कोरोनावर कोणतंही औषधं नसल्याचं जगभरात सांगितलं जात असताना एका डॉक्टरने मात्र एक अजब दावा केला आहे. चंद्रपुरात एका महिला होमिओपॅथीक डॉक्टरने कोरोना प्रतिबंधक औषध डोजचा वापर करून कित्येकांना आजारापासून दूर ठेवल्याचा दावा केला आहे. डॉ. झेनिथ देठे असं या डॉक्टरचं नाव आहे. होमिओपॅथीत 'आर्सेनिक अल्ब'चा वापर डोज रुपात केल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी चक्क क्लिनिकसमोर 'कोरोना प्रतिबंधक औषध मिळेल' असा नवा कोरा बोर्ड लावला आहे. कोरोना आजाराच्या संकटकाळी या डॉक्टरने असा बोर्ड लावल्याने खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात कोरोनग्रस्तांची संख्या 536वर पोहचली आहे. भारतातील राज्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 107 हून अधिक कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. जगभरात अनेक संशोधक कोरोनो व्हायरसवर औषधं शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्याप कोरोनावर कोणतंही ठोस औषधं उपलब्ध नाही. कोणीही कोरोनाचं औषधं सांगून उपचार करण्याचं सांगत असल्यास अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन सरकारकडून जनतेला करण्यात येत आहे. मात्र आता या डॉक्टरने अशाप्रकारे 'कोरोना प्रतिबंधक औषध मिळेल' असा बोर्ड लावल्याने खळबळ उडाली आहे.
  
चीनमधून पसरण्यास सुरुवात झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरातील 186 देशांमध्ये एन्ट्री केली आहे. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात आतापर्यंत 3,72,000 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 16000 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.


भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. याचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांसाठी संपूर्ण भारत लॉकडाऊन केला आहे. पुढील 21 दिवस जनतेला घरात बसून कोरोनाविरुद्ध लढा देण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.