मुंबई : कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी करण्यात येत आहे. आता ही मागणी सत्यात उतरण्याचे संकेत मिळत आहे. महाविकासआघाडी सरकारच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चाचपणी करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वैद्यकीय शिक्षण विभागास जिल्हा प्रशासनाने तातडीने जागा निश्चित करुन उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश आज वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख दिले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील आढावा बैठक  मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमित देशमुख यांनी हे निर्देश दिले. 



या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खासदार अरविंद सावंत, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा,  वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षणचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.


भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी किमान सलग २० एकर जागा असणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जागा निश्चित करुन वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करावी. यानंतर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठीचा आवश्यक असलेला प्रस्ताव (आवश्यक असणारा निधी, मनुष्यबळ, तांत्रिक उपलब्धता) तयार करण्यात यावा, असेही  देशमुख यांनी सांगितले.


दरम्यान, उच्च आणि तंत्र शिक्षण  उदय सामंत म्हणाले की, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. त्यापैकी रायगड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबतचे काम सुरु आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा प्रशासनाने किमान २० एकर जागा निश्चित करुन वैद्यकीय शिक्षण विभागास लवकरात लवकर कळवावे, असे निर्देशही सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.


कोकणात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देण्यात यावी, असे खासदार राऊत म्हणाले.