शिर्डी : साईबाबांच्या जन्मस्थानावरून शिर्डी आणि पाथरी यांच्यात निर्माण झालेल्या वादावर आज मुख्यमंत्री तोडगा काढतील अशी शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिर्डीतून माजी शहराध्यक्ष कैलास कोते, शिवाजी गोंदकर, राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित राहणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिर्डीतून एकूण ३० जणांचं पथक मुंबईकडे रवाना झालं आहे. आज दुपारी २ वाजता मंत्रालयात शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सदाशिव लोखंडे हे नेते या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. पाथरी इथे साईबाबांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी सरकारने १०० कोटींचा निधी मंजूर केल्यामुळे या वादाला तोंड फुटलं होतं. त्यानंतर शिर्डीकरांनी बेमुदत संप पुकारला होता. 


शिर्डीकरांनी हा संप तात्पुरता मागे घेतला आहे. सरकारने साईजन्मभूमीविषयी चुकीची भूमिका घेऊ नये अशी अपेक्षाही शिर्डीकरांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज मुंबईत बैठक आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षाही शिर्डीकरांनी व्यक्त केली आहे. साईभक्तांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत असा तोडगा काढला जाईल अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील सार्इंच्या जन्मस्थळासाठी १०० कोटींचा विकास आराखडा राबवला जाईल अशी घोषणा मागील आठवड्यात केली होती. त्याचे तीव्र पडसाद शिर्डीत  उमटले आहेत. पाथरीला निधी देण्यास शिर्डीकरांची मुळीच हरकत नाही. मात्र साई जन्मस्थान म्हणून त्याची ओळख निर्माण केली जाते याला शिर्डीकरांचा आक्षेप आहे. साईबाबांनी आपल नाव, गाव, जात, धर्म कधीही सांगितला नाही. यामुळेच ते जगभर सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून ओळखले जातात.


यापूर्वीही साईबाबा आणि त्यांच्या आई वडीलांविषयी अनेक बोगस दावे करण्यात आले आहेत. या तथाकथित जन्मस्थानाच्या दाव्याने बाबांवर एका जातीचे, धर्माचे लेबल लावण्याचा प्रयत्न आहे. यामुळे बाबांच्या मूळ शिकवणुकीला व त्यांच्या प्रतिमेलाच धक्का पोहचणार आहे. यामुळे शिर्डीकरांचा जन्मस्थानाच्या दाव्याला आक्षेप आहे.