Milind Deora Join Eknath Shinde-Led Shivsena: आजचा दिवस माझ्यासाठी खूप भावनिक आहे. मी खूप भावू झालोय. काँग्रेस पक्षाशी 55 वर्षांचे नाते मी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात संपवत आहे. माझे राजकारण नेहमीच सकारात्मक आणि विकासाभूमिक राहिले आहे. सर्वांची सेवा करणे हे माझं राजकारण आहे, असं मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश करताना म्हटलं आहे. काँग्रेससोबतची 55 वर्षांची साथ का सोडली, हेदेखील आज मिलिंद देवरा यांनी स्पष्ट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी खासदार आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मिलिंद देवरा यांनी आज पक्षाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. मिलिंद देवरा यांनी पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे व काँग्रेसपक्षावर निशाणा साधला आहे. मला मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करायचे आहेत, अशा शब्दांत त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्यामागचा उद्देशही बोलून दाखवला आहे. 


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत मेहनतीने सगळ्यांसाठी काम करणारे आहेत ते सर्वांसाठी उपलब्ध असतात. जमिनीवर राहणारे नेते आहेत. मला मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करायचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे देशासाठी खूप चांगले व्हिजन आहे. त्यांचे हात मला बळकट करायचे आहेत. माझ्या आईचे माहेरचे नाव फणसाळकर आहे. बाळासाहेब ठाकरे माझ्या वडिलांना महाराष्ट्राचे जावई म्हणायचे. माझे वडील शिवसेनेच्या सहाय्याने मुंबईचे महापौर झाले होते. खासदार होऊन मी मुंबई व महाराष्ट्राचे चांगलं प्रतिनिधित्व करू शकतो असं एकनाथ शिंदे यांचे मत आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो, असं मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे. 


आजच्या काँग्रेसमध्ये आणि माझ्या वडिलांच्या काळातल्या काँग्रेसमध्ये खूप फरक आहे. काँग्रेस आणि उबाठा योग्यतेला महत्त्व देत असते तर मी आणि एकनाथ शिंदे आज इथे नसतो. वर्षावर इतका सहज प्रवेश आणि सहजता मी कधीही पाहिली नाही. मागील दहा वर्षात मुंबईवर एकही दहशतवादी हल्ला झाला नाही. नरेंद्र मोदी यांची नीती यासाठी महत्त्वाची आहे. आजचा हा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे नव्हते. एकनाथ शिंदे यांनी संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो. शिवसेना पक्षाला वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार, असंही देवरा यांनी म्हटलं आहे.