मुंबई : एक जानेवारी शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना पुणे जिल्हाबंदी करण्यात येणार आहे. २८ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान त्यांना पुणे जिल्ह्यात राहण्यास मनाई करण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव-भीमा या ठिकाणी घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांकडून आदेश काढण्यात येणार आहे. १ जानेवारीला विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो लोक कोरेगाव-भीमा या ठिकाणी येत असतात. हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावा यासाठीच नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येतं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी पुण्यात याबाबत बैठक झाली. या बैठकीत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी एकबोटे आणि भिडे यांना जिल्हा बंदी करणार असल्याची माहिती दिली.


हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांच्यासह एकूण १६३ जणांना पुण्यात बंदी घालण्यात आली आहे. तसेच चार तालुक्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आला आहे. १ जानेवारी २०१८ ला कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणी संभाजी भिडे गुरूजी आणि मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात एल्गार परिषदेतील लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.