मेळघाटातील ३ आदिवासी बालकांना दुधातून विषबाधा
एकाच घरातील ३ बालकांना दुधातून विषबाधा...
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात एकाच घरातील ३ बालकांना दुधातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धारणी तालुक्यातील घोटा गावातील एकाच कुटुंबातील गणेश बेठेकर (3), कृती बेठेकर (5) आणि करीना बेठेकर (9) अशा तिघांना दुधातून विषबाधा झाली असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी धारणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
धारणी तालुक्यातील घोटा गावात राहणाऱ्या बेठेकर कुटुंबातील तीन मुलं मंगळवारी सकाळी दुध प्यायली. परंतु दूध शिळे असल्याने त्यांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या मुलांनी दूध पियाल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तात्काळ जवळच्या उतावली येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु परिस्थिती गंभीर असल्याने या तिन्ही बालकांवर सध्या धारणी येथे उपचार सुरु आहे.