औरंगाबाद : औरंगाबादचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा एमआयएम उमेदवार इम्तियाज जलील यांनी पराभव केला. ७ हजार मतांनी जलील यांनी खैरेंचा पराभव केला, २६ व्या फेरीपर्यंत ही चुरशीची लढत रंगली होती. मात्र शेवटच्या फेरीत अखेर जलील यांनी बाजी मारली आहे. माझं नशीब खराब आहे असं सांगत माध्यमांसोबत न बोलताच खैरे मतमोजणी केंद्रातून बाहेर निघून गेले, तर मी आता शहराचा खासदार आहे माझं काम शहराचा विकास करणं आहे अशी जलील यांनी विजयी प्रतिक्रिया दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादेत सलग चार वेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना पराभूत करून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी यश मिळविले. अटीतटीच्या लढतीत शेवटच्या फेरीपर्यंत निवडणुकीची उत्सुकता ताणली गेली होती. २४व्या फेरीअखेर इम्तियाज जलील यांना तीन लाख ८२ हजार १८८ मते मिळाली, तर खासदार चंद्रकांत खैरे यांना तीन लाख ७२ हजार ३०४ मते मिळाली. खासदार खैरे यांना पराभूत करण्याच्या उद्देशाने मराठा कार्ड खेळत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या हर्षवर्धन जाधव यांना दोन लाख ७६ हजार ९२ एवढी मते पडली. शिवसेना मतांमध्ये पडलेल्या फुटीमुळे आमदार इम्तियाज जलील खासदार झाले. शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला एमआयएमने लावलेला हा सुरुंग राजकीयदृष्टय़ा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. 


महाराष्ट्रातील औरंगाबाद लोकसभा जागा ही शिवसेनेचा गड मानली जाते. शिवसेनेने चंद्रकांत खैरे यांनी निवडणूक रिंगणात उतरवले होते तर काँग्रेसकडून सुभाष माणकचंद उभे होते. तर अपक्ष म्हणून हर्षवर्धन जाधव रिंगणात होते. मराठा आरक्षणासाठी हर्षवर्धन जाधव यांच्या भूमिकेमुळे त्यांना मराठा समाजाचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे महाराष्ट्रात झालेल्या मराठा आंदोलनाचा परिणाम औरंगाबाद लोकसभेचे जागांवर झाल्याचे दिसून आले. 1989 पासून सलग आठ वेळा इथे शिवसेना बाजी मारत आली आहे. त्यामुळे औरंगाबादची जागा शिवसेनेचीच असल्याचं निश्चित मानलं जात होतं. परंतु वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्या युतीने आपली ताकद लावत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात बाजी मारली. 


2014च्या लोकसभा निवडणूकीत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेस उमेदवार सुरेश नितिन पाटील यांचा पराभव केला होता. चंद्रकांत खैरे यांना 5 लाख 20 हजार 902 मतं मिळाली होती. तर सुरेश पाटील यांना 3 लाख 58 हजार 902 मतं मिळाली होती. चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद मतदारसंघातून सलग चार वेळा लोकसभा निवडणूकीत विजय मिळवला आहे. 1999 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर 2004, 2009 आणि 2014 मध्ये सलग विजय मिळवला. त्यामुळेच शिवसेनेने पुन्हा एकदा खैरेंनाच रिंगणात उतरवले. 2014 मध्ये आलेल्या मोदी लाटदरम्यान भाजपा-शिवसेना युतीने काँग्रेसचा चांगलाच पराभव केला होता.