मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार? महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप
छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार का याची चर्चा रंगली आहे. समता परिषदेच्या बैठकीत पदाधिका-यांचा तसा सूर पहायला मिळाला. तर भुजबळांची राजकीय कोंडी केली जात असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे.
Chhagan Bhujbal : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप येणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बडे नेते तथा मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत पदाधिका-यांनीच तसा सूर बोलून दाखवलाय.
भुजबळ नाराज
छगन भुजबळ यांना लोकसभा तसेच राज्यसभेला डावलल्यामुळे ओबीसींमध्ये नाराजी दिसून येतेय. तसंच सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होणार असल्यास ओबीसींवर अन्याय होईल असाही सूर बैठकीत दिसून आला. सरकारमध्ये ओबीसींना मिळत असलेल्या सवलतीतही अन्याय होत असल्याची भावना बैठकीत पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. छगन भुजबळांची राजकीय कोंडी केली जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे भुजबळांनी निर्णय घेण्याचा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे.. तेव्हा येत्या काळात छगन भुजबळांचं नाराजी नाट्य घडण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यसभेच्या जागेसाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्यासोबतच राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ इच्छुक असल्याची चर्चा होती. खरं तर भुजबळांची नाराजी ही आतापासूनची नाही.. तर लोकसभा निवडणुकीपासून भुजबळांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवलीय... नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा अखेरपर्यंत रंगला.. भाजप नेतृत्त्वाने आपल्या नावाला मंजुरी दिल्याचा दावा भुजबळांनी केला होता. मात्र अखेरच्या क्षणी हे तिकीट एकनाथ शिंदेंच्या हेमंत गोडसेंना देण्यात आलं.. भुजबळांच्या अलीकडच्या अनेक हालचालींमुळे महायुतीतला त्यांचा असंतोष वाढल्याची चर्चा आहे.. तेव्हा भुजबळ पुढे काय करणार... त्यांचं पुढचं पाऊल काय असणार याकडे राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागलंय.