...त्यानंतर मी स्वतःला संपवणार होतो; आरोपी मनोजचा खुलासा, हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
Mira Road Murder Case: मीरा रोड येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेच्या हत्याप्रकरणात आता नवा खुलासा झाला आहे.
मुंबईः श्रद्धा वालकर हत्याकांडाची (Shraddha Walkar) पुनरावृत्ती मुंबईत घडली आहे. मुंबईनजीकच्या मिरा रोड (Mira Road Murder Case) परिसरात लिव्ह- इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या पार्टनरची हत्या करण्यात आली आहे. सरस्वती वैद (Saraswati Vaidya) असं या महिलेचे नाव असून आरोपी मनोजने (Manoj Sane) तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्याचि विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपी मनोज साने याला अटक केली आहे.
शेजाऱ्यांमुळं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनोज आणि सरस्वती राहत असलेल्या घरातून दुर्गंधी येत होती. त्यामुळं शेजाऱ्यांना शंका आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा उघडताच सरस्वती वैद यांचा अत्यंत वाईट अवस्थेत आढळला. आरोपीने मृतदेहाचे तुकडे करुन बादलीत भरुन ठेवले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने मृतदेहाचे काही तुकडे कुकरमध्येही शिजवले होते.
सरस्वतीने आत्महत्या केल्याचा मनोजचा दावा
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपीने सरस्वतीची हत्या केल्याचा आरोप फेटाळला आहे. मी तिची हत्या केली नसून तिने ३ जून रोजी विष खाऊन आत्महत्या केली होती. माझ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून मी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत होतो, असं आरोपीने पोलिस जबाबात म्हटलं आहे. तसंच, सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर मी आत्महत्या करणार होतो, असंही त्याने म्हटलं आहे.
चारित्र्यावर संशय
तसंच, सरस्वती नेहमी त्याच्या चारित्र्यावर संशय घेत होती. त्यामुळं त्यांच्यातील भांडणे वाढली होती, असंही आरोपीने पोलीस जबाबात म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर, त्याने केलेल्या कृत्याचा त्याला थोडादेखील पश्चात्ताप नाहीये.
आरोपी खोटं बोलत असल्याचा संशय
मनोजने सरस्वतीच्या आत्महत्येचा केलेल्या दाव्यावर पोलिसांना मात्र संशय आहे. पोलिस तपासाची दिशा बदलण्यासाठी तो खोटं बोलत असल्याची शंका पोलिसांना आहे. पोलिसांनी तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे जे.जेमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. त्यानंतर सगळं स्पष्ट होईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
मनोज सानेला दुर्धर आजार
आरोपीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, तो एका दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळं मी कधीही सरस्वतीसोबत शारीरिक संबंध ठेवले नाही. ती माझ्या मुलीसारखी होती. काही वर्षांपूर्वी माझ्यासोबत एक दुर्घटना घडली होती. त्यावेळी मला मला हा आजार झाला, असा दावा त्याने केला आहे.