`आरे खाजगी विकासकांच्या घशात घालण्याचा शिवसेनेचा घाट`
आमदार अॅड. आशिष शेलार यांचा शिवसेनेवर आरोप
नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. आज अधिवेशनात भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आरेचा मुद्द लागून धरला. आरेला जंगल घोषित करू असे आश्वासन दिलेल्या शिवसेनेने सत्तेत आल्यावर मुंबईकरांच्या मेट्रोच्या कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. त्याच शिवसेनेने आता आरेतील आदिवासीपाडे स्थलांतरित करून हा पट्टा निवासी करून खाजगी विकासकांच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे, असा गंभीर आरोप माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे.
याबाबत पत्रकारांशी बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, आरे मध्ये जे आदिवासी पाडे आहेत येथील लोकांना सोई सुविधा देण्यास आमचा विरोध नाही. त्यांना चांगले रस्ते पाणी, वीज, आरोग्याच्या सोई सुविधा, पक्की घरे मिळालीच पाहिजेत. त्याचबरोबर त्यांच्या संस्कृती व कलेचे जतन ही झाले पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे ते म्हणाले.
मात्र आदिवासींच्या नावावर त्यांना स्थलांतरी करून त्यांच्या जमिनी विकासकांना देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असेल तर तो आम्ही हाणून पाडू. असा इशाराही आमदार आशिष शेलार यांनी दिला.
मेट्रो ३ च्या आरे कारशेडच्या बांधकामाला स्थगिती दिल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. मेट्रो कारशेड कामाला दिलेल्या स्थगितीवरून आता शिवसेना भाजपमध्ये राजकारण सुरु झालं आहे. पर्यावरणाच्या मुद्यावरून कारशेड कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिल्यानंतर याचा परिणाम संपूर्ण मेट्रो प्रकल्पावर होणार असल्याचं भाजपकडून सांगितलं जातं आहे.