मुंबई: राज्यमंत्री व भाजप आमदार रवींद्र चव्हाण एका आक्षेपार्ह कृतीमुळे गोत्यात आले आहेत. चव्हाण यांनी एका कार्यक्रमात व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून फोटोसेशन केले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्हासनगर महानगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात हा प्रकार घडला. यावेळी रवींद्र चव्हाण आणि अन्य नेत्यांनी व्यासपीठावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला व अभिवादन केले. त्यानंतर फोटो काढत असताना रवींद्र चव्हाण यांना भान राहिले नाही. त्यांनी फोटो काढताना आपला हात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर ठेवला. काही क्षणांतच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून रवींद्र चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. 


या प्रकाराबद्दल रवींद्र चव्हाण यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पालघर येथील सभेत पायातील पादत्राणे न काढताच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला होता. तत्पूर्वी अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे आता या घटनांबद्दल भाजपचे नेते काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.