मुंबई : दिवाळीचा सण आला आणि हसतखेळत तो पारही पडला. अनेक दिवसांपासून सर्वांच्याच घरी या सणाची तयारी सुरु होती. फराळ, सजावट, रोषणाई या साऱ्य़ासोबतच आप्तेष्ठांच्या भेटीगाठी अशी या सणाची जणू पारंपरिक घडीच. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धकाधकीच्या जीवनात आपण इतके व्यग्र होऊन जातो, की बऱ्याच जवळच्या माणसांची भेट घेणं कठीण होतं. काही प्रसंगी ते शक्य होतानाच दिसत नाही. पण, दिवाळीच्या निमित्तानं मात्र हे सर्व योग जुळून आले आणि काही खास व्यक्तींना भेटण्याची संधी सर्वांनाच मिळाली. 


महाराष्ट्राच्या राजकारणात मानाचं स्थान असणाऱ्या पवार कुटुंबातही यंदा दिवाळीचा उत्साह दरवर्षीप्रमाणंच पाहायला मिळाला. कुटुंबीयांसोबतच यंदा या पवार कुटुंबात एका खास व्यक्तीचाही समावेश होता. (Rohit Pawar)


त्या म्हणजे इंदूबाई. आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार आणि त्यांचे बंधू युगेंद्र यांची भेट झाली इंदूबाईंशी. वयाची शंभरी ओलांडलेल्या या आजीबाई आहेत तरी कोण आणि त्यांच्याशी आपलं काय नातं, याचा उलगडा रोहित पवार यांनी एका ट्विटमधून केला. 



'घरी मदत करतानाच लहानपणी  अजितदादांसह त्यांची पिढी आणि नंतर आमच्याही पिढीची काळजी घेणाऱ्या या इंदूबाई. वयाची शंभरी ओलांडली असतानाही त्यांची तब्येत उत्तम आहे. दिवाळीनिमित्त त्या भेटल्या असता अजितदादा, भाऊ युगेंद्र आणि आनंदिता असं आम्ही सर्वांनी इंदूआजींसोबत फोटो घेतला', असं कॅप्शन त्यांनीह लिहीत काही फोटो पोस्ट केले. 


फोटो टीपतानाचा तो क्षण बराच भावनिक आणि तितकाच आनंददायी होता हे साऱ्यांच्याच चेहऱ्यावरील भाव पाहून लक्षात येत आहे. सोशल मीडियावरही हा फोटो अनेकांच्याच पसंतीस उतरला.