प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कदम यांना जोर का झटका लागला आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार संजय कदम यांची शिक्षा कायम ठेवली आहे.. 2005 सालच्या तोडफोड आणि आणि शासकीय कामात अडथळा प्रकरणी खेड दिवाणी न्यायालयाने दिलेला निकाल अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक वर्ष सश्रम कारावास आणि दंड अशी ही शिक्षा होती. ही शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. सन 2005 मध्ये अतिवृष्टी होऊन हाहाकार माजला होता. खेडमध्ये जगबुडी नदीचे पाणी घुसून करोडो रुपयांचे नुकसान झाले होते. यावेळी संजय कदम शिवसेनेचे स्थानिक नेते होते. व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी याकरिता सेनेचा जमाव तहसील कार्यालयावर गेला यावेळी प्रांताधिकारी श्री.गेडाम उपस्थित होते.


शिवसैनिक आणि गेडाम यांच्यात बाचाबाची सुरु असतानाच संजय कदम यांनी त्यांना धक्काबुक्की करत खुर्ची फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता. यासंदर्भात श्री.गेडाम यांनी तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयात खटला सुरु होता. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन फेब्रुवारी 2015 मध्ये खेड दिवाणी न्यायालयाने राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांना 1 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा आणि दंड अशी शिक्षा सुनावली होती. त्यानंतर संजय कदम यांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. 


याबाबत आज जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल देताना खेड दिवाणी न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. त्यामुळे संजय कदम यांच्यासाठी हा जोर का धक्का मानला जात आहे.