Raj Thackeray About His Wife Comment Regarding Aditya Thackeray:  दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणामध्ये राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारने तपासासाठी विशेष पथकाची म्हणजेच एसआयटीची स्थापना केली आहे. या प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरेंची चौकशी होणार आहे. मात्र आदित्य ठाकरेंवर या प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांसंदर्भात बोलता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी आपलं मत नोंदवत पुतण्याला पाठिंबा दिला. मात्र पत्नीने दिलेल्या या प्रतिक्रियेचा उल्लेख करत राज ठाकरेंनी प्रसारमाध्यमांनाच फैलावर घेतल्याचं आज मुंबईत पाहायला मिळालं.


शर्मिला ठाकरे काय म्हणालेल्या?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रकारांनी दिशा सालियन प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन केली जात असल्याचा संदर्भ देत 15 डिसेंबर 2023 रोजी शर्मिला ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाला अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर देताना काकू शर्मिला यांनी पुतण्या आदित्य ठाकरे यांची बाजू घेतल्याचं पहायला मिळालं. मनसे आणि उद्धव ठाकरे गटामध्ये राजकीय मतभेद अनेकदा दिसून आले आहेत. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांवर अनेकदा टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र दिशा सालियन प्रकरणामध्ये कुटुंब म्हणून राज ठाकरेंचं कुटुंबिय आदित्य ठाकरेंच्या पाठिशी उभे असल्याचं दिसत आहे.


दिशा सालियन प्रकरणासंदर्भात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणाकडे कसं पाहता, असा प्रश्न पत्रकारांनी शर्मिला ठाकरेंना विचारला. हा प्रश्न ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता शर्मिता ठाकरेंनी, "आदित्य असं काही करेल असं मला वाटतं नाही," अशी प्रतिक्रिया नोंदवली. पुढे बोलताना शर्मिला ठाकरेंनी, "चौकश्या काहीही लावू शकतात. आम्ही पण याच्यातून खूपदा गेलो आहोत," असं म्हटलं आणि त्या निघून गेल्या. काही वर्षांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणामध्ये चौकशीसाठी सक्तवसुली संचलनालयाची नोटीस आली होती. राज यांची ईडीच्या कार्यालयामध्ये सखोल चौकशीही झाली होती. याच्याशीच शर्मिला यांच्या या वक्तव्याचा संदर्भ जोडला जात आहे.


नक्की वाचा >> 'भाजपाने आमच्या आदित्यवर...'; संजय राऊतांनी मानले राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांचे आभार


राज ठाकरेंवर प्रश्नांचा मारा


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील 22 लोकसभा मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी मुंबई पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर राज ठाकरेंना धारावी विकास प्रकल्पासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज यांनी सविस्तर उत्तर दिलं. त्यानंतर या बैठकीसंदर्भात प्रश्न विचारण्याऐवजी पुढला प्रश्न एका महिला पत्रकाराने मराठा आरक्षणासंदर्भात विचारला. झालेल्या बैठकीऐवजी इतर विषयांवरुन प्रश्नांचा भडीमार होत असल्याचं पाहून राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत पत्रकारांचाच समाचार घेतला.


नक्की वाचा >> 'अदानींकडे असं काय आहे की...'; 'टाटां'चा उल्लेख करत राज ठाकरेंचा रोखठोक सवाल


राज यांच्याकडून शर्मिला ठाकरेंच्या प्रतिक्रियेचा उल्लेख


"इथं वरती (मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत) काय झालं ते सांगू शकतो. मी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला इथे आलेलो नाही. नंतर तुम्ही काय वाटेल ते सांगता. वाटेल ते छापता," असं म्हणत राज यांनी बैठक वगळता इतर प्रश्नांवर उत्तरं देणं नाकारलं. आपली नाराजी व्यक्त करताना राज यांनी शर्मिला ठाकरेंनी आदित्य ठाकरेंसंदर्भात दिशा सालियन प्रकरणावरुन केलेल्या विधानाचा संदर्भही दिला. "परवाच्या दिवशी माझी बायको काय बोलली. त्यातलं पहिलं वाक्य घेतलं. पुढचं वाक्य घेतलच नाही. कारण ते तुमच्या फायद्याचं होतं. असो," असं म्हणत राज यांनी काढता पाय घेतला. राज ठाकरेंनी एवढं सुनावल्यानंतरही एका महिला पत्रकाराने त्यांना संसदेमधील सुरक्षा भेदण्यात आल्यासंदर्भात विचारलं. त्यावर राज ठाकरे नाही मला नाही माहिती असं म्हणत प्रश्नाचं उत्तर देणं टाळत तिथून निघाले.