`पप्पू`ने भाजपचा काढला दम - राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
भाजपने ज्या राहुल गांधींचा उल्लेख पप्पू म्हणून केला त्याच राहुल गांधीविरोधात आज निवडणूक लढवायला आख्ख भाजप उतरलंय असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आहे.
ते पप्पू आहेत ना, मग त्यांना का घाबरताय एवढे? असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
हार्दीक पटेल सीडी प्रकरणावर राज ठाकरेंनी केली टीका
२०१४ ला आपण महाराष्ट्राची ब्लू प्रिंट दाखवून मनसेने निवडणूक लढवली. गुजरातमध्ये भाजप ब्लू प्रिंट काढून निवडणूक लढवतंय. सीडी लॉन्च करून निवडणूका लढवणं असे उद्योग केवळ आंबट शौकीनच करू शकतात असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंच्या सभेतील महत्वाचे मुद्दे:
१८ तारखेच्या सभेच्या वेळेला वीज, केबल बंद केल्या जातील असं म्हटलं होतं, नेमकं तसंच नाशिकमध्ये घडलं
सरकारला सभेची भीती वाटते यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद दिसून येते
२०१४ ला आपण महाराष्ट्राची ब्लू प्रिंट दाखवून मनसेने निवडणूक लढवली
गुजरातमध्ये भाजप ब्लू प्रिंट काढून निवडणूक लढवतंय
सीडी लॉन्च करून निवडणूका लढवणं असे उद्योग केवळ आंबट शौकीनच करू शकतात
कारवाई करायचीच तर, जे फेरीवाले रेल्वे स्टेशनवर महिलांची छेड काढतात त्यांच्यावर कारवाई करून दाखवा
मराठी पाट्यांच आंदोलन मला पुन्हा हातात घ्यावं लागेल असं दिसतंय कारण अजून काही लोकांना हे समजत नाहीये
फेरीवाल्यांना हटवणे हे आमचं काम नाही, ते सरकारचं काम आहे पण ते सरकारला जमलं नाही म्हणून आम्ही केलं
आज जी स्टेशन्स दिसत आहेत ती माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी करून दाखवलं
अविनाश जाधवच्या जामिनासाठी १ कोटी मागितले. कशाचे एक कोटी मागताय? त्यावर ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणतात की मी ठरवेन किती जामीन मागायचा ते
कमिशनर परमवीर सिंगांना मी सांगतो हिम्मत असेल तर आया बहिणींवर हल्ला करणाऱ्या फेरीवाल्यांना अटक करून दाखवा, त्यांच्याकडे कोटीचे जामीन मागून दाखवा
आझाद मैदानात रझा अकादमीच्या मोर्च्याच्या वेळी पोलीस भगिनींवर त्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, त्यांची छेड काढली, त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच मोर्चा काढला होता
माझ्या हातात ना राज्य सरकार नाही ना केंद्रात माझा प्रतिनिधी नाही, पण वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी नीट परीक्षा लादली जात होती, त्यावेळेला पालक माझ्याकडे आले, हे का होतं तर महाराष्ट्र सैनिकांमुळे होतं
कित्येक वर्ष गुजराती या शहरांत गुण्यगविंदाने राहत होते, तेंव्हा कधी नाही मांसाहाराचा वास येत नव्हता. भाजपचे सरकार आल्यापासून या सगळ्या गोष्टी कश्या सुरु झाल्या?
जैन मुनीम फतवे कसे काढतात पर्युषण काळात मांस बंदी करा म्हणून? तुम्ही जर आरे केलंत तर आमच्याकडून कारे होणारचं
बुलेट ट्रेनला माझा विरोध आहे कारण त्यांचे हेतू स्वच्छ दिसत नाहीयेत
मोदी पंतप्रधान झाल्यावर मी म्हटलं होतं की आता गुजरातचा नाही देशाचा विचार करा
बुलेट ट्रेन सुरु करताना अहमदाबादचा विचार कसा येतो?
जर मोदींना गुजरातच प्रेम वाटू शकतं तर राज ठाकरेला महाराष्ट्राचं प्रेम का वाटू नये?