Raj Thackeray on One Nation One Election: 'वन नेशन-वन इलेक्शन' प्रस्तावाला मोदी मंत्रीमंडळाने (Modi Cabinet) मंजुरी दिली आहे. यानंतर आता यावरुन प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनीही मत मांडलं असून निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या असं सुनावलं आहे. राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एखाद्या राज्यात सरकार कोसळलं किंवा किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का ? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पहायची? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.


राज ठाकरेंनी काय म्हटलं आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"एक देश एक निवडणूक' संकल्पनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी," असं राज ठाकरे म्हणाले आहेत. 


"बरं जर एखाद्या राज्यात सरकार कोसळलं किंवा किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का ? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पहायची? किंवा समजा काही कारणांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का? असा कुठलाच खुलासा झालेला नाही. तो कदाचित होईल," अशी अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. 



यावेळी त्यांनी आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या असंही सुनावलं. ते म्हणाले की, "पण 'एक देश एक निवडणूक' हे सर्व ठीक आहे, आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या. येत्या ऑक्टोबर 2024 मध्ये कित्येक महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये प्रशासक येऊन 4 वर्ष होतील. इतका काळ नगरसेवक नाहीत म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीत. ते जास्त महत्वाचं नाही का? स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सामान्य माणसांच्या जगण्याशी, त्यांच्या प्रश्नांशी असतो. त्याच्याच निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे? निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या".