MNS Over Renaming Aurangabad: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी संभाजीनगरच्या नामांतरणाच्या मुद्द्यावरुन एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापन दिन सोहळा आज ठाण्यामध्ये साजरा करण्यात आला. यावेळेस पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यापूर्वी नांदगावकर यांनी केलेल्या भाषणामधून एमआयएमच्या औरंगाबादच्या नामकरणाला असलेल्या विरोधाच्या मुद्द्यावरुन टीका केली. इम्तियाज जलील यांनी औरंगाबादचं नामांतरण करण्यास विरोध केला होता. जलील यांनी औरंगाबादचं नाव बदलणार असाल तर मुंबईचं नावही बदललं पाहिजे अशी मागणी केली होती. मात्र आता याच टीकेचा समाचार नांदगावकर यांनी मनसेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात घेतला.


जलील यांचा टिम्पाट असा उल्लेख


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापन दिन सोहळा आज ठाण्यामध्ये साजरा करण्यात आला. पहिल्यांदाच ठाण्यामध्ये मनसेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाळा नांदगावकर यांनी छोटेखानी भाषण केलं. या वेळी त्यांनी जलील यांचा टिम्पाट असा उल्लेख केला. "काल परवाकडे संभाजीनगरमध्ये तो टिम्पाट छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करत होता. त्याला मी एवढं सांगू इच्छितो की. तुझ्या औरंबजेबला या लाल काळ्या मातीने गाडलं आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे," असं नांदगावकर यांनी म्हणताच सभागृहामध्ये कार्यकर्त्यांनी नांदगावकर यांच्या वक्तव्याला समर्थन करत घोषणाबाजी केली.


ओवेसी बंधूंचा उल्लेख करत टोला


नांदगावकर यांनी पुढे बोलताना अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला. "कोण बाळासाहेब ठाकरे असंही तो म्हणाला. पण आमचे छत्रपतींचं नावं घेणारे, संभाजी महाराजांचं नाव घेणारे मतांच्या लाचारीसाठी गप्प आहेत," असं म्हणत नांदगावकर यांनी आधीच्या सरकारवर टीका केली. तसेच इम्तियाज जलील यांच्यावर टीका करताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि त्यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावरुनही निशाणा साधला. "तुझ्या त्या हैदराबादच्या दोन भुरट्या चोरांना विचार कोण बाळासाहेब ठाकरे, ते म्हणतील अब्बाजान अब्बाजान," असंही नांदगावकर ओवेसी बंधूंचा थेट उल्लेख न करताना म्हणाले. नांदगावकर यांच्या या विधानानंतरही मनसैनिकांनी जलील यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.


राज काय म्हणाले?


यानंतर राज ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये पक्षाला मतं मिळत नाहीत असा अपप्रचार काही प्रसारमाध्यमांकडून जाणीवपूर्वकपणे केला जात असल्याचा आरोप केला. राज यांनी नाशिकपासून ते पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये 13 आमदार निवडणून आणल्यापर्यंतच्या अनेक मुद्द्यांना हात घालत पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षाची वाटचाल यशस्वीपणे सुरु असल्याचं सांगितलं. राज ठाकरेंच्या हस्ते पक्षाच्या वेबसाईटचं अनावरण करण्यात आलं. या वेबसाईटवर पक्षाने मागील 17 वर्षांमध्ये काय काय काम केलं आहे यासंदर्भातील एक डिजीटल पुस्तिका तयार करण्यात आली आहे. अगदी पक्षाच्या स्थापनेपासून कोणकोणती आंदोलनं करण्यात आली, त्याचा परिणाम काय झाला याबद्दलचा सविस्तर लेखाजोखा या पुस्तिकेमध्ये मांडण्यात आला आहे. अगदी मराठी मुलांच्या रेल्वेभरतीसाठी झालेलं आंदोलन, मराठीसाठीचं आंदोलन, टोलनाक्यांविरोधातील आंदोलन आणि नुकतेच मनसेने राबवलेले भोंग्यांविरोधातील आंदोलनाचाही उल्लेख या पुस्तिकेमध्ये आहे. राज ठाकरेंनी आपण 22 तारखेला म्हणजेच गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये सविस्तरपणे बोलणार असल्याचं सांगितलं.