`उद्धव ठाकरेंचा तो गुण, कोणत्याही ठाकरेंकडे नाही....` निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर मनसेकडून टिकास्त्र
शिवसेनेचं `धनुष्यबाण` हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केल्यानंतर भारतीय जनता पक्षासोबत राज्यात सरकार स्थापन झालं. शिवसेना (Shivsena) पक्षासोबतच धनुष्यबाण या चिन्हावर देखील शिंदे गटाने दावा केला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) नुकताच एक महत्वाचा निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं 'धनुष्यबाण' हे चिन्ह गोठवलं आहे.
शिवसेनेचं 'धनुष्यबाण' हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“उद्धव ठाकरे यांच्या कडे मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही तो म्हणजे गरीब,भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणे त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य आहे ज्याला इंग्रजी मध्ये victim कार्ड अस म्हणतात जे या पुढे सातत्याने बघायला मिळेल” असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करुन शिवसेनेला टोला लगावला आहे.
त्यासोबतच, “संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही म्हणणाऱ्यांचं नावही संपलं आणि चिन्हही. कालाय तस्मै नम:” असं देखील संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मनसे कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासमोर केलेल्या भाषणातील एक व्हिडीओ क्लिप ट्वीट केली. या क्लिपमध्ये “माझ्याकडे निशाणी असली काय नसली काय, नाव असलं काय नसलं काय. मला फरक पडत नाही. कारण माझ्याकडे विचार आहेत”, असं म्हणताना राज ठाकरे दिसत आहेत. ‘वारसा वस्तूचा नसतो, विचारांचा असतो’ असं म्हणत हा व्हिडीओ शेअर केला आहे.
मुंबई महानगरपालिके सोबतच राज्यातील इतर काही महापालिकेच्या निवडणूका आणि पोटनिवडणूकीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मतदारांची सहानुभूती मिळू नये या दृष्टीकोणातून मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी हे ट्विट केलं असण्याची शक्यता आहे.