`....हे राजकारण भाजपाला परवडणारं नाही`, राज ठाकरेंनी दिला इशारा
Raj Thackeray on BJP: विरोधी पक्षातील नेत्यांवर सुरु असलेल्या ईडी (ED) कारवाईवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली असून, अशा प्रकारचं राजकारण भविष्यात भाजपालाही (BJP) परडवणारं नाही असा इशारा दिला आहे.
Raj Thackeray on BJP: राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, हेमंत सोरेन, रोहित पवार यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांवर सुरु असलेल्या ईडी (ED) कारवाईवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली असून, अशा प्रकारचं राजकारण भविष्यात भाजपालाही (BJP) परडवणारं नाही असा इशारा दिला आहे. राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाचपणी करत आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर उत्तरं दिली.
"अशा प्रकारचं राजकारण भविष्यात भाजपालाही (BJP) परडवणारं नाही. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला येत नाही. उद्या जेव्हा सत्ताबदल होईल आणि दामदुपटीने समोरचे अंगावर येतील तेव्हा तुम्ही काय करणार?," अशी विचारणा राज ठाकरेंनी केली आहे. इंदिरा गांधींनी केलं म्हणून तुम्ही करायचं. नंतर परत समोरचे करणार असं होत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पुढे ते म्हणाले की, "मतदारांना निर्णय घेण्याची गरज आहे. मतदार जोपर्यंत राजकारण्यांना वठणीवर आणत नाही तोपर्यंत काही मिळणार नाही. 10 चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आणि एका चांगल्या गोष्टीसाठी मतदान केलं तर समोरचा परत 10 गोष्टी चुकीच्या करायला मोकळा होतो".
अयोध्या राम मंदिराचा भाजपाला निवडणुकीत फायदा होईल का? असं विचारण्यात आलं असता राज ठाकरे म्हणाले की, "प्रत्येक निवडणूक वेगळी असते. कांद्यावर निवडणूक होईल असं कोणाला वाटलं नव्हतं. आताही काय होईल याचा काही अंदाज लावणं कठीण आहे. बाबरी मशीद, दंगली, बॉम्बस्फोट यावेळी झालेलं मतदान रागातून झालं होतं. तेव्हा काँग्रेसच्या आणि इतर पक्षाच्या लोकांनीही भाजपाला मोठ्या प्रमामात मतदान केलं होतं. 2014 लाही रागातून मतदान झालं होतं, एखादी गोष्ट पूर्ण झाल्यानंतर समाधानातून किती मतदान होतं हे अजून देशाने पाहिलेलं नाही. आजपर्यंत प्रश्नांवर निवडणूक झाली आहे. पण उत्तरावर होणारी ही पहिली निवडणूक असेल. राम मंदिर झाल्याचा आनंद आहे. राम मंदिर झाल्याचा आनंद आहे, पण मी भाजपाचा मतदार नाही असंही म्हणणारे आहेत. 1995 साली महाराष्ट्रातील अनेकांनी शिवसेना, भाजपाला दंगलीच्या पार्श्वभूमवीर मतदान केलं होतं. पण तेच पुढे राहील असं काही नसतं".
दरम्यान सर्व सुस्थितीत आल्यानंतर आपण अयोध्या राम मंदिरात जाऊ असं स्पष्ट केलं आहे. तोपर्यंत नाशिकचं काळाराम मंदिर आहे असंही ते म्हणाले.
"प्रत्येक पक्षात गटबाजी असते. सत्तेतली दिसत नाही आणि विरोधी पक्षातली दिसते. सत्तेतले विरोधात आल्यावर ती दिसते. लोकसभा, पालिका निवडणूक आल्यावर त्यांच्यातील तडेही दिसतील. आमचा उघडा कारभार असल्याने दिसतं," असंही उपहासात्मकपणे राज ठाकरे म्हणाले.