Raj Thackeray on Alliance: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) कोकण (Konkan) दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहे. दरम्यान यावेळी त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारणावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील राजकारण गलिच्छ झाले आहे असं सांगताना त्यांनी आपण व्य़भिचार करणार नाही असं स्पष्ट सांगितलं. ते दापोलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी आपण कोणाशीही युती करणार नसल्याचं स्पष्ट केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने राज्यात नवं समीकरण जुळून आलं आहे. दरम्यान, यानंतर मनसेचे नेते, कार्यकर्ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असं आवाहन करत आहेत. तसे बॅनरही शिवसेना भवनाच्या समोर लावण्यात आले होते. पण आता मात्र राज ठाकरेंनी आपण कोणाशी युती करणार नाही सांगत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. "महाराष्ट्रात जे काही सुरु आहे, ते पाहता मी कोणाशीही युती करेन असं वाटत नाही," असं ते म्हणाले. 


"मी व्यभिचार करणार नाही. मला जमत नाही आणि जमणारही नाही. याला राजकारण म्हणत असाल तर या राजकारणासाठी मी नालायक आहे. दोन, तीन वर्ष निवडणुका प्रलंबित राहतात आणि त्यावर कोणी काही बोलत नाही. नुसती चालढकल सुरु आहे," अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. 


"पूर्वी लोक राग व्यक्त करायला रस्त्यावर यायची. पण आता मोबाइलवरुन राग व्यक्त करतात आणि शांत होतात. त्या मोबाइल फोनवरील प्रतिक्रिया राजकारणी पाहत नाहीत. शांत जनता पाहतात, ज्यांनी राग व्यक्त करुन झालेला असतो," असंही ते म्हणाले. दरम्यान, लोकसभा, विधानसभा स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा करताना राज ठाकरेंनी मी एकला चलोची भूमिका घेणार असल्याचं सांगितलं आहे. 


'तडजोड करणार नाही'


दरम्यान राज ठाकरे यांनी चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी घरात बसेन, पण तडजोड करणार नाही अशी भूमिका मांडली. ते म्हणाले "या महाराष्ट्राबद्दलचा राग जोपर्यंत तुमच्यात जिवंत आहे, तीच एक आशा आहे. बाकीच्यांकडून आता काहीही होऊ शकत नाही. माझ्या बाबतीत मी आताच सांगतो की, अशा प्रकारच्या घाणेरड्या, व्यभिचारी तडजोड करायला लागली तर घऱात बसेन".


राज ठाकरेंनी यावेळी कार्यकर्त्यांना महाराष्ट्रावरील प्रेम कमी होऊ देऊ नका असं आवाहनही केलं. ते म्हणाले "तुमच्या कामाचा लेखाजोखा ठेवला जाणार आहे. त्यामुळे कामाला लागा. महाराष्ट्रावरील प्रेम कमी होऊ देेऊ नका, ते वृद्धिंगत करा".