कोल्हापूर : राज्यासह देशात कांदा दर शंभरीपार गेला आहे. त्यामुळे कांद्यावरुन राजकारण तापले आहे. आधीच कांद्याचे दर वाढल्याने गृहिणींच्या डोळ्यातून पाणी येत आहे. कांदा दर १०० ते १२० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. कांदा दरावर सरकारकडून नियंत्रण आणण्यासाठी आणि कांद्याचा पुरवठा होण्यासाठी परदेशातून कांदा आयात करण्यात येत आहे. या कांदा आयातीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा विरोध दर्शविला आहे. मोदी सरकारचा हा आत्मघाती निर्णय आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांद्याचे भाव वाढून दोन महिने झाले. मग सरकारने आत्ताच का कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला, सरकारचा हा निर्णय आत्मघातकी आहे. तुर्कस्तानमधून ११ हजार टन कांदा आयात केल्यानंतर बाजारपेठत कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळतील, अशी भिती राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांचा कांदा बाजारपेठ येत असताना सरकार आत्ता का कांदा आयात करत आहे. ग्राहकाला दिलासा द्यायचा होता तर आधीच का कांदा आयात केला नाही, असा सवाल राजू शेट्टी यांनी सरकारला विचारला आहे.


तुर्कस्तान मधून कांदा आयात केल्यानं कांद्याचे भाव प्रचंड गडागडतील. आता कुठे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा चांगला पैसा मिळत होता. त्याचवेळी केंद्र सरकारने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, उन्हाळी कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे. अशावेळी कांदा आयात केल्याने येथील कांद्याचे दर कोसळतील, असे शेट्टी म्हणालेत.


दिल्लीत राजकारण तापले


कांद्याच्या वाढत्या दरावरून आता राजधानी दिल्लीतलं राजकारण तापलंय. काँग्रेसनं कांदा दरवाढीवरून केंद्र सरकारला घेरण्याच्या प्रयत्न केलाय. त्यासाठी काँग्रेसनं संसदेच्या परिसरात निदर्शनं केली. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या लोकसभेतल्या विधानाचाही निषेध करण्यात आला. आपण कांदा खात नाही त्यामुळे आपला कांद्याशी संबंध नसल्याचं वादग्रस्त विधान निर्मला सीतारामन यांनी कांद्याच्या दरवाढीच्या चर्चेदरम्यान केले होते. त्यांच्या या विधानावर टीका करत सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळेच कांद्याची दरवाढ झाल्याचा आरोप चिदंमबरम यांनी केलाय. त्यांनीही आपले पुत्र आणि खासदार कार्ती चिदंबरम यांच्यासह या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला.