Maharashtra Rain: पुण्यात पावसाने धुमाकूळ घातला असून, काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई (Mumbai) आणि रायगडमध्ये (Raigad) पावसाने हजेरी लावली असून सर्वसामान्य जीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकी काय स्थिती आहे याची माहिती दिली आहे. पुण्यात बचावकार्यासाठी लष्कारलाही अलर्ट राहण्यास सांगण्यात आलं असल्याची एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तसंच मुंबईत अजित पवार कंट्रोल रुममध्ये असून, परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मुंबई, पुणे आणि रायगड येथे जास्त पाऊस पडत आहे. महाराष्ट्रातील उर्वरित ठिकाणीही जास्त पाऊस पडत आहे. सर्व प्रशासनाला सकाळपासून सूचना दिल्या असून, अलर्ट मोडवर राहण्यास सांगण्यात आलं आहे. फिल्डवर उतरुन लोकांची मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यात खडकवासला तलावात आणि कॅचमेंट परिसरात खूप पाऊस पडला. मावळमध्ये जवळपास 255 मिमी पाऊस पडला. मुळशीत 170 मिमी पाऊस पडला. धरणातही आणि कॅचमेंटमध्येही जास्त पाऊस पडला असल्याने त्याचा दुहेरी फटका बसला आहे. यामुळे पुण्यात जास्त पाणी वाहून गेलं आणि साचलं. सर्वात आधी जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त तसंच एसडीआरएफ, एनडीआरएफ यांना सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक यंत्रणांनी सूचना दिल्या आहेत," असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 


लष्करालाही अलर्ट राहण्याच्या सूचना 


"मी लष्करालाही अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मेजर जनरल अनुराग वीज हे घटनास्थळी आहेत. कर्नल संदीप यांच्याशीही बोलणं झालं आहे. नौदल, हवाई दलाच्या रेस्क्यू टीमही तैनात ठेवा, आवश्यक भासल्यास त्यांनाही हलवण्यास सांगण्यात आलं आहे," असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 


शाळा आणि कार्यालयांना सुट्टी 


"एखाद्या ठिकाणी अडकलेल्या लोकांना एअरलिफ्ट करावं लागल्यास ती तयारी ठेवण्यात आली आहे. सर्वजण तयार आहेत. आरोग्य, पोलीस आणि बचाव यंत्रणा सर्वांना एकत्रित काम करत पुणेकरांना मदत करण्यास सांगण्यात आलं आहे. पूरपरिस्थिती आहे तेथील लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यास सांगण्यात आलं आहे. त्यांचं पाणी, फूड पॅकेट यांच्या व्यवस्था केल्या आहेत. राहण्याची व्यवस्थाही केली आहे. शाळा आणि कार्यालयांना सुट्टी देण्याचा आदेश दिला आहे. सर्व परिस्थितीवर माझं लक्ष आहे. सर्व अधिकारी माझ्या संपर्कात आहेत," अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. 
 
"मुंबईत कंट्रोल रुममध्ये अजित पवार असून, त्यांच्याशी संपर्कात आहे. मुंबई पालिकेच्या आयुक्तांशी बोललो असून 222 पंप सुरु आहेत. अंधेरीतीली सब-वे पाण्यामुळे बंद आहे. कुर्ला आणि घाटकोपरमध्य पाणी साचलं आहे, ते काढलं जात आहे. रेल्वे वाहतूक सुरु आहे. सर्व प्रशासन फिल्डवर काम करत आहेत. मुंबईत ऑरेंज अलर्ट असून, पुढील 3 ते 4 तास सावधगिरी बाळण्याची गरज आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 


पुढे ते म्हणाले की, "नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन करत आहे. नागरिकांचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा असून, त्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. रायगडमधील कुंडलिका, सावित्री नदी याच्या पूरपातळीकडे लक्ष आहे. लँडस्लाईड होत असलेल्या भागातील सर्व लोकांना हलवण्याच्या सूचना केल्या आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व काळजी घेण्यात आली आहे".