अमर काणे, झी मीडिया, नागपूर : मुसळधार पावसाने नागपूरमध्ये (Nagpur) अक्षरशः दाणादाण उडवली. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. विमानतळाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर तर नदीचं स्वरूप आलं होतं. अनेक ठिकाणी घरांमध्ये सुद्धा पाणी घुसल्याच्या तक्रारी आहेत.
परतीच्या पाऊस सुरू असल्याने अनेक जिल्ह्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यातच आज नागपूरसह पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात सकाळच्या सुमारास झालेल्या दमदार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यात हवामान विभागाने (Meteorological Department) ऑरेंज अलर्ट (Orange Alert) म्हणजेच मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा दिला आहे. सोमवारी सकाळी साडे 6 ते साडे 11 वाजेपर्यंत 64 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील अनेक सखल भागात रस्त्यावर जणू नदी वाहत असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र नागपूकराना पाहायला मिळालं


मागील काही दिवसंपासून उकाड्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. घामाच्या धारा वाहत असतांना रविवारी संध्याकाळी अचानक ढगांचा कडकडाटसह पावसाच्या सरी बरसल्याने नागपुरकरांना उकड्यापासून दिलासा मिळाला. पण सोमवारी कामावर जाण्यासाठी बाहेर पडण्याच्या वेळेस रिप रिप पाऊस सुरू होता. पण सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान पावसाने जोर धरत जोरदार बॅटिंग केली. या एका तासात तुफान पाऊस पडल्याने शहारत अनेक भागात पावसाचं पाणी साचलं. त्यामुळे कामावर जाणाऱ्या लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. 


शहरातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकी खोळंबल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. यातच नदी नाले दुथडी भरून वाहत असताना आज नागपुर शहरातील रस्तेच जणू दुथडी भरत वाहत होते. नागपुर वर्धा मार्गावरून डॉ. बाबसाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारा रस्त्यावर पावसाने पाणी साचल्याने नदीची स्वरूप आलं होतं. त्यामुळे प्रवाशांना या मार्गावरून बाहेर पडणं कठीण झालं. महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाश्यांना मुख्य रस्त्यावर त्याच्या बॅगासह बाहेर काढण्यास मदत केली. यासह मनीषनगरकडे जाणारा अंडरपासमध्ये सुद्धा पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना फेऱ्याने जावे लागले


यंदाच्या वर्षात मुसळधार पावसाने अगोदरच हैराण झाले असतांना परतीच्या पावसाने पुन्हा शेतकरी चिंतेत सापडला आहे. सुरवातीला झालेल्या पावसाने पीक उध्वस्त होऊन गेली आहे. यातच परतीचा पाऊस गरजेपेक्षा जास्त झाल्यास पुन्हा पिकाचे नुकसान करेल का अशी चिंता लागली आहे. आज पूर्व विदर्भातील वर्धा, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून ऑरेंज अलर्टच्या दिलाय.